जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन; परिसंवादांसह शस्त्र, पुस्तक प्रदर्शनाची मेजवानी

By बापू सोळुंके | Published: May 28, 2024 05:57 PM2024-05-28T17:57:25+5:302024-05-28T18:07:50+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशतकी वर्षांनिमित्त शिवचरित्र साहित्य संमेलनाचे जूनमध्ये आयोजन

The first Shiv Charitra Sahitya Samelan will be held at Jalgaon | जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन; परिसंवादांसह शस्त्र, पुस्तक प्रदर्शनाची मेजवानी

जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन; परिसंवादांसह शस्त्र, पुस्तक प्रदर्शनाची मेजवानी

छत्रपती संभाजीनगर: सन २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे त्रिशतकी वर्ष आहे. यानिमित्ताने २६ ते २९ जून दरम्यान जळगाव येथे शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भावी पिढीला शिवचरित्र सकारात्मक दृष्टीने हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक रवींद्र पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालय आणि इतिहास प्रबोधन संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील जेष्ठ इतिहास संशोधक विजयराव देशमुख असतील. तर संमेलनाचे उदघाटन छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्या हस्ते होईल. या संमेलनात शिवपूर्व काळातील संत साहित्य, शिवोत्तर काळातील संत साहित्य, राज्याभिषेक गरज, उपलब्धी, आणि दूरगामी परिणाम या विषयावर वेगवेगळे परिसंवाद होईल. तर शिवचरित्र काळाची गरज या विषयावर प्रकट मुलाखत होईल. यासोेबतच मराठ्यांची धारातीर्थे या विषयावर चर्चासत्र होईल. जागरण गोंधळ, शिवकालीन लोककला आणि शाहिरी पोवाडे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. 

शिवकालीन नाणी,शस्त्रांसह, पुस्तक प्रदर्शन
या साहित्य संमेलनात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन असेल. सुमारे ट्रकभर शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनात पहायला मिळतील. तसेच शिवकाळात वापरली जाणारी नाणीही या प्रदर्शनाचे आकर्षण असेल. यात सोन्या, चांदीची नाणी, तसेच अन्य मुद्रांचा समावेश असेल.सुमारे चार कोटी रुपयांचा हा खजिना सामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. शस्त्र प्रशिक्षण, आरमार प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, पगडी प्रदर्शन हे या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्ये असेल. या संमेलनात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत  प्रा. शंकर जाधव, प्रा.डॉ मधुकर साठे  आणि प्रा शिवाजी गायकवाड यांनी केले.

Web Title: The first Shiv Charitra Sahitya Samelan will be held at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.