शौर्य पर्व! कारगिलचा रणसंग्रामात मराठवाड्याच्या शूरवीरांची अतुलनीय, वीरश्रींची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:50 IST2025-07-26T16:47:10+5:302025-07-26T16:50:25+5:30
कारगिल विजय दिवस २६ जुलै: विजयाच्या क्षणाचे साक्षीदार झालेल्या जवानांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव

शौर्य पर्व! कारगिलचा रणसंग्रामात मराठवाड्याच्या शूरवीरांची अतुलनीय, वीरश्रींची कहाणी
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : ‘थरारक पर्वतीय भाग, हिमवृष्टी, ऑक्सिजनची कमतरता आणि सातत्याने सुरू असलेला गोळीबार. झाडाच्या फांद्या घेऊन आम्ही वरती चढत होतो. इतक्यात पाकिस्तानच्या एका भीषण स्फोटाने एका जवानाच्या पायाचा चुराडा झाला. आम्ही हादरलो. पण, तो मात्र ठामपणे म्हणाला, ‘मला इथेच सोडा. तुम्ही पुढे जा. मला काही होणार नाही.’ कारगिल युद्धात लढलेल्या मराठवाड्यातील जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना रणांगणातील आठवणी जिवंत केल्या. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले.
विजयाचा क्षण
बटालियन १०६ इंजिनिअर्समध्ये असलेले सैनिक संजय साबळे सांगतात, दर मिनिटाला पाकिस्तानचा बॉम्ब वर्षाव सुरू होता. डोंगर फोडून रस्ता बनवण्याचे काम आमच्याकडे होते. दिवसभर जीव मुठीत घेऊन दगड फोडायचो, तंबूही जळून खाक झाला. रात्रीच्या वेळी मृत सहकाऱ्यांची शरीरे खाली आणताना काळीज तुटायचे. जिथून काही मिनिटांपूर्वी आम्ही गेलो त्या ठिकाणी बॉम्ब पडला. अगदी थोडक्यात आम्ही बचावलो. जेव्हा तिरंगा उंच फडकताना पाहिला, विजयी क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आमच्या युनिटला सायटेशन मेडल मिळाले, ही त्यांच्या असीम धैर्याची ओळख होती.
क्षणाक्षणाला मृत्यू
सिग्नल ऑपरेटर सुदाम साळुंखे म्हणाले, दरास खाडीला ज्या सैनिकांनी घेरले त्या ८० जणांच्या ग्रुपमध्ये मी होतो. पाक सैन्याला ठार करून टेकडी ताब्यात घेण्याचे टास्क आमच्याकडे होते. २१ दिवसांत आम्ही ते पूर्ण केले. आमचे अनेक जवान शहीद झाले. पाकिस्तानकडून सातत्याने गोळ्या, बॉम्बचा वर्षाव सुरू होता. झाडाच्या फांद्यांचे आवरण करून आम्ही चढाई करायचो. जवान जखमी होत होते. पण, त्यांना सोडून पुढे जावे लागायचे. रणभूमीतून जिवंत परतलो हे आमचे नशीबच.
२१ व्या वर्षी युद्ध
भगवान बोरमळे म्हणाले, मी २१ वर्षांचा होतो. १०६ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये पूल, बंकर्स, हेलिपॅड, रस्ते आम्ही सगळे बनवले. शेवटचे ८ दिवस आठवले की अंगावर काटा येतो. जीव मुठीत घेऊन डोंगर चढत होतो. मृत सहकाऱ्यांचे तुकडे गोळा करत होतो. कोणाचा हात, कोणाचा पाय काही ओळखण्यासारखे नव्हते. देशात दिवाळी साजरी होत होती आणि आम्हाला जेवायलाही मिळत नव्हते. बर्फाच्छादित भूमीवर जे आम्ही अनुभवले ते शब्दात सांगता येणार नाही.