अनेक वर्षांपासून कब्जा असलेली एकता चौक ते पीरबाजार येथील अतिक्रमणे जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 19:28 IST2024-09-25T19:27:25+5:302024-09-25T19:28:16+5:30
शहानूरमियाँ दर्गा ते भाजीवाली बाई चौकापर्यंतची २२ लहान-मोठी अतिक्रमणे मनपाकडून काढून टाकण्यात आली.

अनेक वर्षांपासून कब्जा असलेली एकता चौक ते पीरबाजार येथील अतिक्रमणे जमीनदोस्त
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयासमोरील अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यानंतर महापालिकेचा उत्साह द्विगुणित झाला आहे. मंगळवारी एकता चौक ते जुना पीरबाजार या २४ मीटर रुंद रस्त्यावरील लहान-मोठी २२ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. पक्के बांधकाम असलेल्या २२ जणांना नोटीस देण्यात आली. त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, अशी सूचना मनपाने केली.
शहरात अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अतिक्रमणांच्या मुद्द्यावर बोट ठेवले होते. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, रस्ते रुंद करणे, लेफ्ट टर्न मोकळे करणे आदी निर्णय घेतले. प्रशासक जी. श्रीकांत यांनी अतिक्रमण हटाव विभागाला मुख्य रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त सविता सोनवणे, वॉर्ड अधिकाऱ्यांनी शहानुरमियाँ दर्गा चौक ते भाजीवाली बाई चौक (जुना पीरबाजार) या २४ मीटर रस्त्याची पाहणी केली. अतिक्रमणांमुळे रस्ता १८ मीटर झाला असल्याचे निदर्शनास आले.
मंगळवारी अचानक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. चौसर नगरातील एकता चौक ते जुना पीरबाजार येथील एका बाजूने झालेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. सिमेंट रस्त्यावर हॉटेल, गॅरेज, वॉशिंग सेंटर, हार्डवेअर, मांसविक्रीची २२ दुकाने थाटण्यात आली होती. या दुकानांसमोरील वाहनांमुळेही रस्ता अरुंद झाला होता. याच रस्त्यावर एक मोठा गृह प्रकल्प राबविण्यात येत असून, रस्त्यावरच प्रवेशद्वार उभारून सुशोभीकरण केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी प्रकल्पाच्या व्यवस्थापकास बोलावून अतिक्रमण काढून घेण्याची तंबी दिली.
२४ तासांत अतिक्रमण काढून घ्या
शहानुरमियाँ दर्गा ते भाजीवाली बाई चौकापर्यंत काही मालमत्ताधारकांनी पक्के बांधकाम केले आहे. पक्की बांधकामे २४ तासांत काढून घेण्याची नोटीस मनपाकडून बजावण्यात आली आहे. ही बांधकामे काढून न घेतल्यास मनपा बांधकामे पाडणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.