‘अब मैं तुझे बताता हूँ' धमकी खरी ठरली; तरुणाच्या खांद्यात खुपसलेला चाकू थेट पाठीतून बाहेर

By सुमित डोळे | Published: January 6, 2024 12:15 PM2024-01-06T12:15:16+5:302024-01-06T12:16:42+5:30

मोठ्या भावाने वाद मिटविण्यासाठी बोलावले; पण 'छोटू'ने तरूणावर थेट चाकूने वार करत केला खून

The elder brother called to settle the dispute; But 'Chotu' stabbed the young man directly with a knife | ‘अब मैं तुझे बताता हूँ' धमकी खरी ठरली; तरुणाच्या खांद्यात खुपसलेला चाकू थेट पाठीतून बाहेर

‘अब मैं तुझे बताता हूँ' धमकी खरी ठरली; तरुणाच्या खांद्यात खुपसलेला चाकू थेट पाठीतून बाहेर

छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपूर्वी बायजीपुऱ्यात राहणाऱ्या साजेब खान शकील खान व इक्रार उर्फ छोटू मतीन खान या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हापासून छोटूच्या मनात राग धुमसत होता. तेव्हाच त्याने साजेबला ‘अब मैं तुझे बताता हूँ' अशी धमकी दिली. शुक्रवारी इक्रानच्या भावाने वाद सोडवण्यासाठी साजेबला दुपारी ४ वाजता हॉटेलमध्ये बोलावले. मित्राच्या उपस्थितीत ते बोलत असतानाच छोटू तेथे गेला. परिणामी, त्यांच्यात पुन्हा वाद पेटला व छोटूने चाकू काढून साजेबच्या खांद्यात खुपसला. वार इतका जबर होता की, चाकूचे टोक थेट पाठीतून बाहेर निघाले. यात साजेबचा मृत्यू झाला.

आयटीआयचा विद्यार्थी असलेला साजेब व छोटूमध्ये अनेक दिवसांपासून छोट्या-मोठ्या कारणांवरून खटके उडत होते. चार दिवसांपूर्वी छोटूने शिवीगाळ केल्याने त्यांच्यातले वाद हाणामारीपर्यंत पोहोचले. छोटूच्या मनात तेव्हापासून साजेबविषयी राग वाढला होता. गुरुवारी त्याने अन्य मुलांकडे साजेबचा ठावठिकाणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वाद वाढण्याची शक्यता जाणवल्याने छोटूचा मोठा भाऊ अबरारने वाद मिटवण्यासाठी मित्र सय्यद फैजल सय्यद शायकत (रा. अल्तमश कॉलनी) याच्यासोबत शुक्रवारी भेटण्याचे ठरवले होते.

छोटूला सहभागी करणे टाळले; पण..
अबरार, साजेब, फैजल शुक्रवारी दुपारी ४ वाजता हॉटेल पटेल येथे चहा पिण्यासाठी भेटले. 'छोटू आया तो मॅटर बढेगा' असे म्हणत त्यांनी त्याला सहभागी करणे टाळले. ही बाब कळताच छोटू हॉटेलमध्ये गेलाच. अबरार त्याची समजूत घालत असताना छोटूने पुन्हा साजेबकडे रागाने पाहत शिवी हासडली. साजेबने त्यावर आक्षेप घेताच छोटूने चाकू खुपसला. फैजलने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करताच छोटूने त्याच्या हाताची बोटे कापण्याचा प्रयत्न केला. यात फैजलही जबर जखमी झाला.

नशेखोरीवर गंभीर प्रश्न
साजेब रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. यामुळे एकच हलकल्लोळ उडाला. खुनाची घटना कळाल्याने मोठा जमाव जमला. साजेबला एमजीएम रुग्णालयात नेले गेले. डाॅक्टरांनी रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न सुरू करून पंपिंग सुरू केली. मात्र, त्याच दरम्यान साजेबचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, रावसाहेब काकड यांनी धाव घेतली. तोपर्यंत मारेकरी पळून गेला होता. या सगळ्यात हॉटेलमध्ये रक्त उडाल्याने चालकाने ते रक्तच पुसून टाकले. यामुळे हॉटेलचालकाला पोलिसांनी रात्री ठाण्यात नेऊन बसवले होते. नव्या वर्षात शहरातील पहिल्याच खुनाने जिन्सीत खळबळ उडाली. छोटूदेखील नशेच्या आहारी गेलेला असल्याने पुन्हा एकदा नशेखोरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Web Title: The elder brother called to settle the dispute; But 'Chotu' stabbed the young man directly with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.