मिरवणुकीतील ‘डीजे’ने कुणाचा वाढला ‘बीपी’, कुणाला तात्पुरता बहिरेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:37 IST2025-04-16T13:36:50+5:302025-04-16T13:37:17+5:30

‘डीजे’च्या आवाजामुळे काहींच्या हृदयाची धडधड वाढली. तर, काही जणांना तात्पुरता बहिरेपणा आला.

The DJ at the procession caused someone's blood pressure to rise, someone else's to suffer temporary deafness | मिरवणुकीतील ‘डीजे’ने कुणाचा वाढला ‘बीपी’, कुणाला तात्पुरता बहिरेपणा

मिरवणुकीतील ‘डीजे’ने कुणाचा वाढला ‘बीपी’, कुणाला तात्पुरता बहिरेपणा

छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीतील ‘डीजे’च्या दणदणाटामुळे काही जणांचा रक्तदाब वाढला. ‘डीजे’च्या आवाजामुळे काहींच्या हृदयाची धडधड वाढली. तर, काही जणांना तात्पुरता बहिरेपणा आला. उपचारासाठी रुग्णालयात धाव घेणाऱ्यांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे.

सोमवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मिरवणुकीत सहभागी झालेल्या उषा सुरडकर यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवला. त्यात त्यांचा रक्तदाबही वाढला. त्रास वाढतच असल्याचे लक्षात येताच पती विनोद सुरडकर आणि अन्य नातेवाइकांनी उषा सुरडकर यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. त्यांच्यावर मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक-३ मध्ये उपचार सुरू आहेत. मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या की, सदर रुग्ण आली तेव्हा ‘बीपी’ वाढलेला होता. पुढील उपचार सुरू आहे.

मी चक्कर येऊन पडले
डीजे वाजविण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. अशातच मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ‘डीजे’तून एखादी लहर धडकल्यासारखे वाटत होते. अटॅक येतो का, असे वाटत होते. ऐकू येत नव्हते. अशा अवस्थेत मी बेशुद्ध पडले. आई-वडिलांनी रुग्णालयात नेले. आज सकाळी सुटी झाली.
- अंजली सुरडकर

‘डीजें’मध्ये आवाजाची स्पर्धा
औरंगपुरा येथे दोन ते तीन ‘डीजें’मध्ये आवाजाची स्पर्धा सुरू होती. त्यातच पत्नी उषा हिची प्रकृती बिघडली. बीपी वाढल्याने घाटीत दाखल केले. ३-४ दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत उषाला काही समजतही नव्हते. डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळली पाहिजे.
- विनोद सुडकर, रुग्णाचे पती

कानात शिट्टीसारखा आवाज
डीजेमुळे त्रास झालेले दोन रुग्ण आले. एका रुग्णाची एका कानाने कमी ऐकू येत असल्याची तक्रार होती. तर, दुसऱ्या रुग्णाच्या कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत आहे, अशी तक्रार होती.
- डाॅ. रमेश रोहिवाल, कान-नाक-घसा तज्ज्ञ

दोन रुग्णांना त्रास
डीजेच्या आवाजामुळे त्रास झालेले दोन रुग्ण आले. ऐकू कमी येणे आणि कानात आवाज येणे (टिनिटस) असा त्रास या दोन रुग्णांना होत होता.
- डॉ. श्रीकांत सावजी, कान-नाक-घसा तज्ज्ञ

Web Title: The DJ at the procession caused someone's blood pressure to rise, someone else's to suffer temporary deafness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.