वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अकॅडमीचा संचालकच पुरवत होता उत्तरे !

By सुमित डोळे | Published: August 2, 2023 12:18 PM2023-08-02T12:18:18+5:302023-08-02T12:20:12+5:30

रेकॉर्डवरील गुन्हेगाराची अकॅडमी, उत्तरांसाठी ५० हजार देऊन मुले बसवली

The director of the academy was providing the answers in the exam for the post of forest guard! | वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अकॅडमीचा संचालकच पुरवत होता उत्तरे !

वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अकॅडमीचा संचालकच पुरवत होता उत्तरे !

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सोमवारच्या वनसंरक्षक भरती परीक्षेत उमेदवारांना चिकलठाण्यातील शिवराणा करियर अकॅडमीमधून उत्तरे पुरवले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी परीक्षा संपण्याच्या दहा मिनिटे आधीच छापा टाकला असता तेथून परीक्षार्थींना इंटरनेट, पुस्तकांतून उत्तरे शोधून सांगत होते. पोलिस आल्याची कुणकुण लागताच चौघांनी पोबारा केला, तर एकाला पोलिसांनी झटापटीत जखमी होऊनही पकडून ठेवले. विनोद डोभाळ (रा. दरेगाव) असे त्याचे नाव आहे. परीक्षा घोटाळ्यातील कुख्यात गुन्हेगार व अकॅडमीचा संचालक सचिन गोमलाडू ऊर्फ राजपूत याच्यासह लोधवाड व अन्य दोघे पळून गेले.

अंमलदार संतोष गायकवाड व प्रकाश सोनवणे यांना या रॅकेटविषयी माहिती मिळाली. निरीक्षक गौतम पातारे यांच्या सूचनेवरून ते खातरजमा करण्यासाठी थेट अकॅडमीत गेले. विद्यार्थी बनून अकॅडमीमध्ये प्रवेशासाठी चौकशी करायची असल्याचे सांगून प्रवेश केला. मात्र, अशा घोटाळ्यात तरबेज असलेल्या राजपूतला संशय आला व त्याने आहे त्याच अवस्थेत पळ काढला. तेथे मोबाईलवर उत्तरे देणाऱ्या चौघांनीही पळ काढला. तोपर्यंत उपनिरीक्षक सचिन जाधव, अंमलदार संतोष सोनवणे, देविदास काळे हे पोहोचले. पण आरोपी पळू लागले. सोनवणे व गायकवाड यांनी डोभाळला पावसात पाठलाग करून पकडले. उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ ऑगस्टपर्यंत पाेलिस कोठडी सुनावली.

पाच ते सहा वेळा ताब्यात, तरीही वारंवार घोटाळे
राजपूतने सुरुवातीला टीव्ही सेंटर परिसरात स्पर्धा परीक्षांची अकॅडमी स्थापली होती. त्यानंतर त्याने डमी उमेदवार बसवणे, उमेदवारांना उत्तरे पुरवण्याचे प्रकार सुरू केले. यापूर्वी जवळपास पाच ते सहा वेळेला तो रॅकेटमध्ये कारागृहात गेला. राज्यभरात तो यासाठी कुख्यात आहे. साताऱ्याच्या पोलिस चालक भरतीत अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर त्याने अकॅडमी चिकलठाण्यात हलवून तेथे हेच उद्योग सुरू केले, हे विशेष.

प्रश्नपत्रिकेचे १११ फोटो प्राप्त
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा पाचही जण मोबाइलवर उत्तरे पुरवत होते. जप्त केलेल्या एका मोबाइलमध्ये व्हॉट्सॲपला उपसरपंच सचिन कारोळ या नावावरून पेपरचे तब्बल १११ फोटो प्राप्त झाले होते. हे नागपूरच्या एका परीक्षार्थीने पाठवलेले फोटो आढळून आले. एका फोटोवर पेनने अनुक्रमांक टाकून त्यापुढे आकडे लिहिलेले होते. तेवढ्या प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना सांगितल्याची कबुली डोभाळने दिली. शनिवारी त्याने राजपूतसोबत पार्टी केली होती. त्या पार्टीत त्याने डोभाळला उत्तरे देण्यासाठी ५० हजार रूपये देण्याचे कबूल करून बोलावले होते. उमेदवाराकडून १३ ते १५ लाख रूपये घेतल्याचेही आरोपींनी सांगितले.

इकडे घोटाळे, तिकडे तत्त्वज्ञान !
सचिन गोमलाडू काही महिन्यांपूर्वी शहर पोलिस चालक भरतीतदेखील डमी उमेदवार पुरवल्याप्रकरणी आरोपी होता. त्यात तो चार महिने कारागृहात राहिला. सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलाच्या परीक्षेत वैजापूरचा अविनाश सजन गोमलाडू (२१, रा. शिवगाव) हा डमी उमेदवार म्हणून रंगेहात सापडला होता. सचिन गावाकडील राजकारणात देखील सक्रिय आहे. कारागृहात राहूनदेखील तो खुलेआम रॅकेट चालवतो. विशेष म्हणजे, केंब्रिज चौकातील मैदानावर विद्यार्थ्यांचा सराव घेतो. तेथे करिअर, संस्कारांबाबत चक्क तत्त्वज्ञान शिकवतो. सोशल मीडियावर त्या आशयाचे रील बनवतो.

Web Title: The director of the academy was providing the answers in the exam for the post of forest guard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.