ऊसात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना मानवी स्पर्श, मादी येते पण 'गंध' ओळखून नेत नाही!
By साहेबराव हिवराळे | Updated: November 18, 2025 13:32 IST2025-11-18T13:28:19+5:302025-11-18T13:32:41+5:30
माणसाच्या एका स्पर्शाने बिबट्याच्या मादीने तोडले मातृत्वाचे बंधन? पिल्लांवर उपासमारीचे संकट!

ऊसात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना मानवी स्पर्श, मादी येते पण 'गंध' ओळखून नेत नाही!
छत्रपती संभाजीनगर : बिरोळा व जीरी (ता. वैजापूर) शिवारात दहा दिवसांपूर्वी ऊसतोडी सुरू असताना फडात सापडलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना मजुरांनी हाताळले. ही बाब वनविभागास कळल्यानंतर पथकाने ही पिल्ले ताब्यात घेतली व प्राणिमित्र पथकास सोबत घेत मादी व पिल्लांची नैसर्गिकरीत्या पुनर्भेट घडविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत; परंतु मानवाने स्पर्श केलेल्या या पिल्ल्यांच्या आसपास मादी बिबट्या रात्री येऊन जाते मात्र, त्यांना सोबत घेऊन जात नाही. प्राणी जगातील ही अस्पृश्यता परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
कसा घडला प्रकार?
ऊसतोड सुरू असताना मजुरांना मादी बिबट्या व तिची तीन पिल्ले दिसली. त्यामुळे अचानक आरडाओरड झाल्याने मादी दोन पिल्लांना घेऊन झाडीमध्ये निघून गेली; परंतु एक पिल्लू मागे राहिले. उत्सुकतेपोटी गावातील अनेकांनी त्याला हाताळले. पंचक्रोशीतील चार किलोमीटर अंतरावरील गावात सापडलेल्या दुसऱ्या पिल्लालाही काही ग्रामस्थांनी हाताळल्याची माहिती वनविभागास मिळाली. वनविभागाच्या पथकाने गेल्या दहा दिवसांपासून त्या परिसरात विशेष नाइट-व्हिजन कॅमेरे, पिंजरे, पावलांचे ठसे यांच्या साहाय्याने मादीची हालचाल शोधून तिला पिल्लांच्या जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मादी येते… पण पिल्लांना नेत नाही!
रानात पाचट जळाल्याने परिसर ओसाड झाला असला तरी मादी रोज रात्री पिल्लांना शोधत आसपास फिरताना नाइट कॅमेऱ्यात स्पष्ट दिसते. मात्र, पिल्लांना मानवी स्पर्श झाल्यामुळे ‘मानवी गंध’ ती ओळखते आणि पिल्लांना उचलून नेत नाही. यामुळे ही दोन्ही पिल्ले उपासमार व वन्यजिवी हल्ल्याच्या दुहेरी धोक्यात सापडली आहेत.
वनविभागाची धडपड
पिल्लांचा अधिवास नैसर्गिक स्थितीत आणण्यासाठी विशेष उपाय, शांत वातावरणाची निर्मिती, आवाज व नागरिकांची गर्दी रोखणे यासारख्या कृती प्राणिमित्र आणि वनविभागाचा चमू रात्रंदिवस करत आहे. परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, पिल्लांपासून दूर राहण्याचे आणि कोणतीही माहिती तत्काळ वनविभागास कळवण्याचे आवाहन केले जात आहे.
जबाबदारीची गरज
‘‘मादीने पिल्ले स्वीकारावीत यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.’’
-आशिष जोशी, प्राणिमित्र, रेस्क्यू टीमचे प्रमुख.
त्यामुळे पिल्लांना स्वीकारत नाही
“काही नागरिकांनी व्हिडीओ करण्याच्या नादात पिल्लांना हाताळले. हा अतिशय धोकादायक प्रकार आहे. या मानवी स्पर्शामुळेच मादी पिल्लांना स्वीकारत नाही. हे स्पष्ट होत आहे.”
-पी. बी. भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर.