दख्खनचा ताज उजळला, पण अर्धाच! बीबी का मकबऱ्याच्या मुख्य मीनारचे काम कधी करणार?
By संतोष हिरेमठ | Updated: November 20, 2025 19:59 IST2025-11-20T19:57:43+5:302025-11-20T19:59:23+5:30
मुख्य आकर्षण असलेल्या मकबऱ्याचे चारही मुख्य मीनार अजूनही उजळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दख्खनचा ताज उजळला, पण अर्धाच! बीबी का मकबऱ्याच्या मुख्य मीनारचे काम कधी करणार?
छत्रपती संभाजीनगर : दख्खनचा ताज म्हणून अभिमानाने उभा असलेला बीबी का मकबरा परिसर सध्या नव्या उजेडात न्हाऊन निघत आहे. परिसरातील घुमट, संरक्षक भिंत, छोट्या मीनारांच्या संवर्धनाने स्मारकाचा ऐतिहासिक ठसा पुन्हा ठळकपणे उमटू लागला आहे. हिरवेगार बगिचे, स्वच्छ पायवाटा आणि संवर्धनाने संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. मात्र, या चमकदार रूपांतरणातही मुख्य आकर्षण असलेल्या मकबऱ्याचे चारही मुख्य मीनार अजूनही उजळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
बीबी का मकबऱ्याच्या चारही मीनारांचे, ‘तीन तेरा’ वाजले आहेत. ‘दख्खनचा ताज’, ‘मिनी ताज’ अशी ओळख असलेला हा मकबरा आणि मीनार जागोजागी काळवंडला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून मकबऱ्यात ठिकठिकाणी संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. संरक्षक भिंत, मकबऱ्याच्या पाठीमागील जागेतील ‘उत्तरी दालन’, ‘बारादरी’ अशी ओळख असलेल्या इमारतीच्या संवर्धनाचे काम करण्यात आले. सध्या संरक्षक भिंतीतील घुमटाच्या संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे परिसर उजळत आहे; परंतु मुख्य मीनारचे संवर्धन गतीने पूर्ण करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.
चुन्यासह गूळ, डिंक, उडीद डाळ...
मकबरा बांधताना ज्या साहित्याचा वापर करण्यात आला, त्याच साहित्याचा वापर करून संवर्धनाचे काम केले जात आहे. मीनारच्या प्लास्टरसाठी चुन्यासह गूळ, डिंक, उडीद डाळ, विटांची पावडर वापरण्याचे नियोजन आहे.
लवकरच कामाला सुरुवात
बीबी का मकबरा येथे संवर्धनाची विविध कामे सुरू आहेत. मीनारच्या संवर्धनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यातील मंजुरी आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंजुरी येताच कामाला सुरुवात होईल.
- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण