'मराठा आंदोलनाचे श्रेय मुख्यमंत्री किंवा मला नाही, तर गरीब मराठ्यांना!'; जरांगेंचा मोठा दावा
By बापू सोळुंके | Updated: September 5, 2025 13:02 IST2025-09-05T13:00:20+5:302025-09-05T13:02:23+5:30
जी.आर. वर टीका करणारे श्रीमंत मराठे आहेत. त्यांना आरक्षणाची गरज नाही: मनोज जरांगे

'मराठा आंदोलनाचे श्रेय मुख्यमंत्री किंवा मला नाही, तर गरीब मराठ्यांना!'; जरांगेंचा मोठा दावा
छत्रपती संभाजीनगर: आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेल्या गरीब मराठा बांधवांनी शांततेत आणि संयम दाखविला. मुंबईतील एकाही व्यक्तीला कोणीही त्रास दिला नाही. सर्व जण शांततेत गेले आणि परतलेही, याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा मला नाही तर गरीब मराठ्यांचे आहे, असे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.
मुंबईत पाच दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मागील तीन दिवसांपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठा आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सयंमाने हातळले, याचे सर्व श्रेय त्यांनाच असल्याचा दावा शिवसेनेच्या मुखपत्रात करण्यात आला. शिवाय भाजपकडूनही जल्लोष आणि बॅनरबाजी केली जात आहे, याकडे जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आंदोलन यशस्वी होण्याचे सर्व श्रेय फडणवीस यांना अथवा मला नाही, तर ते सर्वसामान्य गरीब मराठ्यांना आहे. हे आंदोलन त्यांनी अत्यंत शांततेत आणि संयमाने केले आहे. आंदोलनकर्ते परतल्यानंतर मुंबईकरांनी आंदोलनकर्त्यांनी कोणताही त्रास दिला नाही, उलट अनेकांनी मदत केल्याचे सांगितल्याच्या बातम्या आल्याचे त्यांनी नमूद केले.
टीका करणारे श्रीमंत मराठे
राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हैदराबाद संस्थानचे गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. याविषयी काढलेल्या जी.आर. वर टीका करणारे श्रीमंत मराठे आहेत. त्यांना आरक्षणाची गरज नाही. यामुळे ते कधी आंदोलनही करीत नाही. यामुळे हा लढा आम्हा गरीब मराठ्यांचा आहे, तुम्ही यात पडू नका,अशा शब्दात जरांगे यांनी मराठा समाजातील टिकाकारांना सुनावले.
हा जी.आर. चांगलाच म्हणूनच भूजबळांची टीका
हा जी.आर. चांगला नसता तर येवलावाल्याने (मंत्री छगन भुजबळ) यांनी नाराजी व्यक्त केलीच नसती. कारण या जी.आर.मुळेच मराठवाड्यातील मराठा समाजात ओबीसीमध्ये जाणार असल्याचे त्यांना चांगलेच माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले. यात जर काही छोट्या त्रुटी असतील तर त्या आपण शासनाकडून दुरूस्त करून घेऊ असेही त्यांनी नमूद केले.