चालकाचा ताबा सुटल्याने समृद्धीवर भरधाव कंटेनर उलटला, दोन भाग होऊन विरुद्ध दिशेने पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:32 IST2025-02-01T11:31:23+5:302025-02-01T11:32:15+5:30
कंटेनरचे दोन भाग विरुद्ध दिशेने पडल्याने बराच वेळ दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.

चालकाचा ताबा सुटल्याने समृद्धीवर भरधाव कंटेनर उलटला, दोन भाग होऊन विरुद्ध दिशेने पडले
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाच्या सावंगी इंटरचेंजजवळ भरधाव कंटेनर शुक्रवारी रात्री ११:०० वाजता उलटून त्याने दोन पलट्या मारल्या. कंटेनरचे दोन भाग विरुद्ध दिशेने पडल्याने बराच वेळ दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.
चारचाकी वाहनांची वाहतूक करणारा कंटेनर शुक्रवारी नागपूरवरून समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाला होता. शहरालगत असलेल्या सावंगी इंटरचेंजपासून साधारण १० ते १२ किलोमीटर अंतरावर चालकाचा अतिवेगामुळे स्टिअरिंगवरचा ताबा सुटला आणि कंटेनरने दोन ते तीन वेळेस पलट्या मारल्या. वाहनाचा वेग एवढा होता की, कंटेनर उलटून पडल्यानंतरचा अर्धा भाग मुंबईच्या दिशेने, तर अर्धा भाग नागपूर कॉरिडॉरच्या दिशेने होता. यादरम्यान दोन्ही दिशांना वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर अन्य वाहनचालक मदतीस धावून गेले. त्यांनी चालकाला केबिनबाहेर काढून समृद्धी महामार्गाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अपघाताची माहिती दिली.