'बाळाला त्रास होतोय, शांत रहा'; विनंती करणाऱ्या कुटुंबावर टवाळखोरांचा हल्ला, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:20 IST2025-08-29T13:20:13+5:302025-08-29T13:20:29+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना: टवाळखोरांना शांत करण्याचा प्रयत्न जीवावर बेतला!

'बाळाला त्रास होतोय, शांत रहा'; विनंती करणाऱ्या कुटुंबावर टवाळखोरांचा हल्ला, दोघे गंभीर
छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्री भररस्त्यावर आरडाओरड करत धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांमुळे लहान मुलाला त्रास झाला. त्यामुळे त्यांना शांत बसण्यास सांगण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर याच टवाळखोरांनी प्राणघातक हल्ला करत एकाचा कान फाटेपर्यंत तर दुसऱ्याच्या मेंदूला सुज येईपर्यंत मारहाण केली. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता गारखेड्यातील नवनाथनगरमध्ये ही घटना घडली.
एसटी वर्कशॉपमध्ये मेकॅनिक असलेले भागीराम ढवळे (वय ३५) हे कुटुंबासह नवनाथनगरमध्ये राहतात. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या शेजारी राहणारे अविनाश काशिनाथ शेंडगे (३२), रवी काशिनाथ शेंडगे (३०), आदित्य अनिल काळे (१९) व एक अल्पवयीन मुलगा जोरजोरात आरडाओरड करत होते. धिंगाणा घालत होते. यामुळे भागीराम यांचा लहान मुलगा झोपेतून उठून रडायला लागला. ढवळे यांनी घराबाहेर येत पाहिले असता त्यांना शेंडगे भावंडे धिंगाणा घालताना दिसून आले. त्यांनी त्यांना लहान मुलाला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगत शांत राहण्याची विनंती केली. मात्र, शेंडगे व काळेने त्यांना शिवीगाळ सुरू केली. हा धिंगाणा पाहून भागीराम यांचे मोठे भाऊ रवी देखील तेथे दाखल झाले.
ढवळे बंधू टवाळखोरांना समजावून सांगत असताना वाद टोकाला पोहोचला. सर्वांनी मिळून रवी व भागीराम ढवळे यांच्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अविनाशने लोखंडी रॉड आणत भागीराम यांच्या डोक्यात मारून वार केला. यात ते रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. तेव्हा रवी शेंडगेने विटकरीने त्यांच्या कानावर गंभीर वार केले. यात भागीरथ यांचा कान फाटून मेंदूला गंभीर दुखापत पोहोचल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
चार हल्लेखोरांना अटक
या गंभीर घटनेनंतर भंडारी यांनी तत्काळ हल्लेखोरांना अटकेचे आदेश दिले. यात पळून जाण्याआधीच रवी व आदित्यला २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तर अविनाशला १ वाजता अटक करण्यात आली.