सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ
By साहेबराव हिवराळे | Updated: June 6, 2023 18:45 IST2023-06-06T18:44:05+5:302023-06-06T18:45:50+5:30
काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ
छत्रपती संभाजीनगर : भूखंडांवर एक नव्हे तर पाच-पाच मजली इमारती उभा राहिल्या खऱ्या; पण ज्या कारणास्तव महानगरपालिकेत गेल्यावर पाणी तत्काळ तसेच इतर सेवासुविधा मिळतील, अशी आशा होती, त्या अद्यापही पदरी न पडल्याने सातारा परिसराची जुनी ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची रहिवाशांवर वेळ आली आहे.
काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
मनपाने अधिक लक्ष देण्याची गरज
समाजकल्याण विभाग, आदिवासी वसतिगृह असून, पोस्ट कार्यालय तसेच महावितरण कार्यालयदेखील आहे. मनपाने आरोग्य केंद्र देखील सुरू केलेले आहे. दवाखाने, शैक्षणिक संस्थादेखील असून, मोठमोठाली मंगल कार्यालये असल्याने परिसर नावारूपाला आलेला आहे. परंतु, पाणीपुरवठा कायमस्वरूपी करण्याची गरज आहे. टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवक
जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता पाहता येथील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढलेलीच आहे. खासगी शाळांनाही लाजवेल अशी गुणवत्ता टिकून ठेवलेली असल्याने पालकही खूश आहेत. बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवक वळल्याचे दिसते.
- जमील पटेल
मंदिरामुळे अनेकांना रोजगार
खंडोबा मंदिरामुळे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे पाने फुले, हळदी-कुंकू, रेवड्या विक्रीतून बऱ्यापैकी व्यवसाय सुरू आहे. परंतु येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. सध्या मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम शासनाकडून सुरू आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, कडूबा शिराणे यांनी केली आहे.
पुलाखालून रस्ता कधी होणार?
तिन्ही पूल प्रशासनाने तयार केले आणि ते वाहतुकीसाठी खुले केले असले तरी पावसाळ्यात पुलाखालून वाहने चालविणे किंवा वसाहतीची कनेक्टिव्हिटी कशी राहील याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम गतीने पूर्ण करावे.
- फिरोज पटेल, माजी सरपंच
दलित वसाहतीला १२ एप्रिलनंतर पाणीच नाही
मनपाच्या सार्वजनिक विहिरीतून जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सातारा गावात आणि दलित वसाहतीत केला जातो. १२ एप्रिलनंतर पाणीपुरवठाच झालेला नाही.
- अनिल जाधव
वीजपुरवठा कधीही खंडित
सातारा परिसरातील वीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. फ्यूज कॉल सेंटरवरही फोन उचलत नाहीत. याबाबत पूर्वसूचना त्वरित ग्राहकांना देणे गरजेचे आहे.
- आबा चव्हाण