रात्री मित्रांना हॉटेलवर बर्थडे पार्टी दिली; सकाळी तरुणाचा कॅनोलमध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 16:23 IST2023-05-06T16:20:14+5:302023-05-06T16:23:53+5:30
बर्थडे पार्टी ठरली अखेरची; सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव फाट्याजवळ सापडला तरुणाचा मृतदेह.....

रात्री मित्रांना हॉटेलवर बर्थडे पार्टी दिली; सकाळी तरुणाचा कॅनोलमध्ये आढळला मृतदेह
सिल्लोड : तालुक्यातील वांजोळा येथील एका २८ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी डोंगरगाव फाट्याजवळ उघड़कीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. संतोष जादुसिंग बमनावत ( २८ रा. वांजोळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री संतोष बमनावत या तरुणाचा वाढदिवस होता. मित्रांसोबत वाढदिवस साजराकरून एका हॉटेलवर त्यांनी पार्टी केली. यानंतर शनिवारी सकाळी हॉटेल गारवा समोरील पाण्याच्या पाटात त्याचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. सदरील घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह धाव घेतली व मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. खून झाल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली. ग्रामीण पोलिस रात्रीपासूनच्या घटनाक्रमाची माहिती घेत असून संतोष सोबत पार्टीत असलेल्या त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून वेगवेगळ्या दिशेने ग्रामीण पोलिस तपास करीत आहे.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवस ठरला अखेरचा
संतोष हा तालुक्यातील भवन माणिकनगर येथे एका गरेज मेकॅनिकल म्हणून काम करत होता. शुक्रवारी त्याने काम आटपून वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या काही मित्रांना निमंत्रण दिले व एका हॉटेलमध्ये त्यांनी पार्टी केली. मात्र ही त्याची शेवटची वाढदिवस पार्टी ठरेल असे त्याला वाटले पण नसेल.
पोलीस प्रशासन लागले कामाला.....
सदरील घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संजय लांजेवार, प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी मुकुंद घाव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीण पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, शहर पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षिरसागर, सचिन सोनार, संजय आगे, सचिन काळे, राजेंद्र काकडे, पंडित फुले, कैलास दारकुंडे, रामेश्वर जाधव हे सदरील घटनेच्या तपासात लागले आहे.