दोन्हीकडील 'टोकांच्या वक्तव्यां'मुळे वातावरण तापले; मनोज जरांगेंच्या पोलीस सुरक्षेत मोठी वाढ!
By बापू सोळुंके | Updated: October 7, 2025 13:19 IST2025-10-07T13:14:37+5:302025-10-07T13:19:43+5:30
मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. तेव्हापासून या जी.आर.च्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.

दोन्हीकडील 'टोकांच्या वक्तव्यां'मुळे वातावरण तापले; मनोज जरांगेंच्या पोलीस सुरक्षेत मोठी वाढ!
छत्रपती संभाजीनगर: मराठा आणि ओबीसी नेत्यांचे परस्परविरोधी वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा मंगळवारी(दि.७) सकाळपासून वाढविली आहे. जरांगे पाटील हे साध्य शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. तेव्हापासून या जी.आर.च्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. हा जी.आर. रद्द करावा, यासाठी ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात येत आहे. शिवाय काही जणांना उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना लक्ष केले. तर ओबीसी नेते ही जरांगे पाटील यांच्यावर टिका करीत आहेत. मराठा आणि ओबीसी नेत्यांच्या परस्परांवरील टोकांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी जरांगे यांची सुरक्षा वाढविल्याचे दिसून आले. १० पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले. तसेच पोलिसांची मोठी व्हॅन तेथे ठेवण्यात आली आहे.
नियमित बंदोबस्त
मनोज जरांगे पाटील हे जेव्हाही रुग्णालयात दाखल होतात, तेव्हा त्यांना नियमित सुरक्षा पुरविली जाते. तशीच सुरक्षा आजही देण्यात आली आहे. ही नियमित सुरक्षा आहे.
- सचिन कुंभार, पोलीस निरीक्षक जवाहरनगर.