युनिव्हर्सल हायस्कूल दहावी उत्तीर्ण नऊ विद्यार्थ्यांचे टीसी देईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:28 IST2025-05-30T13:28:31+5:302025-05-30T13:28:54+5:30

कोराेना काळातील शुल्क बाकी असल्याचा शाळेचा दावा

The 11th admission process has begun, but Universal High School will not give TC to nine students who passed 10th. | युनिव्हर्सल हायस्कूल दहावी उत्तीर्ण नऊ विद्यार्थ्यांचे टीसी देईना

युनिव्हर्सल हायस्कूल दहावी उत्तीर्ण नऊ विद्यार्थ्यांचे टीसी देईना

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा परिसरातील युनिव्हर्सल हायस्कूलमधून दहावीची परीक्षा उतीर्ण नऊ विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (दाखला) शाळा प्रशासन देत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांसह पालक शाळेच्या धाेरणामुळे हवालदिल झाले असून, माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना टीसी देण्याच्या सूचना केल्या. मात्र, शाळा प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार या हायस्कूलच्या शुल्काविरोधात पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित पालकांनी २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षातील ६० हजार रुपये शुल्क शाळेला भरलेले आहे. त्याशिवाय शाळेचे शुल्क हे जिल्हा शुल्क नियामक समितीने ठरवावे, असेही आदेशात म्हटलेले आहे. जिल्हा शुल्क नियामक समितीने आणखी शुल्क भरण्यास सांगितल्यास ते सुद्धा देण्याची तयारी पालकांनी दाखवलेली आहे. याविषयी न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना दहावीचे हॉलतिकीट देताना आणि आता टीसी देताना छळ करीत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना टीसी आवश्यक असून, देण्याची मागणी केली आहे. याविषयी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, माहिती घेऊन प्रतिक्रिया कळवितो, असे सांगण्यात आले. त्यानंतर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना पत्र
माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना नऊ पालकांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावानिशी पत्र पाठवून संबंधितांस टीसी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळेच्या प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Web Title: The 11th admission process has begun, but Universal High School will not give TC to nine students who passed 10th.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.