'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

By विजय सरवदे | Published: May 26, 2023 12:08 PM2023-05-26T12:08:58+5:302023-05-26T12:09:08+5:30

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली.

'That' feat of professors! Similar handwriting in 372 answer sheets of Physics, crime against two professor | 'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : बोर्डाची झोप उडवून टाकणाऱ्या त्या ३७२ उत्तरपत्रिकांचा गुंता अखेर निकालाच्या दिवशीच सुटला. याप्रकरणी फर्दापूर ठाण्यात सोयगाव तालुक्यातील दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका प्राध्यापिकेचाही समावेश आहे, हे विशेष!

याप्रकरणी राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळा (ता. सोयगाव) येथील प्रा. राहुल भगवानसिंग उसारे आणि याच महाविद्यालयाच्या धनवट येथील प्रा. मनीषा भागवत - शिंदे यांच्यासह पडद्यामागील साथीदारांवर ४२०, ४६८, ४६९, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. या उत्तरपत्रिका प्रामुख्याने बीड व हिंगोली जिल्ह्यातील आहेत. बोर्ड अधिकाऱ्यांनी ९ ते १३ मे दरम्यान सुमारे ४००हून अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. विद्यार्थी व पालकांनी या प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे चौकशीदरम्यान लेखी दिले. त्यानंतर बोर्डाने केंद्र संचालक, कस्टोडियन, पर्यवेक्षकांची चौकशी केली. तरीही या प्रकरणाच्या मुळापर्यंत बोर्डाला पोहोचता आले नाही. त्यानंतर यापैकी ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर असल्याचा निष्कर्ष तदर्थ समितीने काढला आणि संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली. उत्तरपत्रिकांना नेमके पाय फुटले कसे व कोठून, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडला की, त्याच्या संमतीने दुसऱ्याने कोणी उत्तरे लिहिली, हे सारेच प्रश्न अनुत्तरीत होते.

दरम्यान, प्रा. राहुल उसारे आणि प्रा. मनीषा शिंदे यांच्याकडे या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. १३ मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश असताना या दोघांनी त्यानंतर तब्बल २५ दिवस त्या स्वतःकडे ठेवून घेतल्या. नंतर ८ एप्रिल रोजी त्या बोर्डाकडे जमा केल्या. बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा हा प्रसंग समोर आला. दरम्यान, या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. मात्र, बोर्डाने हस्ताक्षरातील मजकूर वगळून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केलेे व त्यांचा निकाल जाहीर केला.

आता पोलिस या उत्तरपत्रिकांत का, कशासाठी आणि कोणी उत्तरे लिहायला लावली, याचा शोध घेतीलच. परंतु, या प्रकरणात संशयाची सुई थेट विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या दोन शिक्षकांशिवाय अनेक लोक या प्रक्रियेत सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: 'That' feat of professors! Similar handwriting in 372 answer sheets of Physics, crime against two professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.