नवीन पाणीपुरवठा योजनेतील सहा जलकुंभांची चाचणी पूर्ण; आता फक्त हस्तांतरणाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 20:09 IST2024-12-05T20:09:33+5:302024-12-05T20:09:48+5:30
दाेन मोठ्या जलकुंभांचा वापर सुरू : एका जलकुंभाची चाचणी बाकी

नवीन पाणीपुरवठा योजनेतील सहा जलकुंभांची चाचणी पूर्ण; आता फक्त हस्तांतरणाची प्रतीक्षा
छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात ५३ जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. त्यातील दोन जलकुंभ मनपाला हस्तांतरित केले. त्यांचा वापरही सुरू आहे. सहा जलकुंभांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्याचे हस्तांतरण बाकी आहे. एका जलकुंभाची चाचणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत देण्यात आली. सहा जलकुंभाचा वापर सुरू झाल्यावर नागरिकांना अधिक दाबाने पाणीपुरवठा होईल.
नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात नवीन १९०० किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत एक हजार किमी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. याशिवाय नक्षत्रवाडी येथील डोंगरावरून शहरात सहा वेगवेगळ्या जलवाहिन्या शहरात आणण्यात येत आहेत. मार्चपर्यंत शहरात पाणी आलेच पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जीव्हीपीआर कंपनीची यंत्रणा कामाला लागली आहे. पूर्वीच्या तुलनेत कामाला गतीही प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. महापालिका आणि नगरपरिषदेच्या काळातील ३६ जलकुंभ आहेत. हे अपुरे पडत असल्याने नवीन ५३ जलकुंभ उभारण्यात येत आहेत. त्यातील पहाडसिंगपुरा आणि शिवाजी ग्राऊंड येथील जलकुंभ वापरण्यात येत आहेत. सहा नवीन जलकुंभांची चाचणी पूर्ण झाली. एकाची चाचणी सुरू आहे. सहा जलकुंभांचा वापर कधीही सुरू करता येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
वारंवार आश्वासने
जलकुंभ हस्तांतरित करण्यासाठी अनेकदा तारीख घोषित करण्यात आली. मात्र, नियोजित वेळेत जलकुंभ हस्तांतरित झाले नाहीत. छोटे-मोठे लिकेज, आऊटलेटमध्ये समस्या आदी तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला. चाचणी झालेल्या जलकुंभातून मनपा कधीही पाणीपुरवठा सुरू करू शकते, असे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.
कोणते जलकुंभ तयार ?
- हिमायतबाग, प्रतापनगर, दिल्लीगेट, शाक्यनगर, नक्षत्रवाडी, मिसारवाडी गरवारेजवळ.