सिडको चौकात भीषण अपघात, गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडले, हेल्मेटचा झाला भुगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:40 IST2021-12-16T13:35:19+5:302021-12-16T13:40:45+5:30
अपघात झाल्यानंतर गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक तेथून पसार झाला आहे.

सिडको चौकात भीषण अपघात, गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडले, हेल्मेटचा झाला भुगा
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यावरील सिडको चौकात मोपेड आणि ट्रकच्या भीषण अपघातात मोपेडस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रोहित दिनकर नरवडे ( २१ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रमा नगर येथील राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान झाला.
प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीवरून, दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान रोहित सिडको चौकातून हायकोर्टच्या दिशेने मोपेडवरून ( एमएच २० एफके ९५९० ) जात होता. दरम्यान, त्याच्या जवळून गॅस सिलेंडर घेऊन जाणार ट्रक जात होता. अचानक रोहितची मोपेड स्लीप झाली आणि तो खाली कोसळला. यावेळी जवळून जाणाऱ्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली त्याचे डोके आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक तेथून पसार झाला.
अपघात ऐवढा भीषण होता कि, रोहितने घातलेल्या हेल्मेटच्या चुराडा होऊन त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. यावेळी रस्त्यावर मासांचा खच पडला होता. काही प्रत्यक्षदर्शिनी याची माहिती लागलीच वाहतूक पोलिसांना दिली. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पोलीस अपघात स्थळावरून पसार ट्रकचा शोध घेत आहेत.