छत्रपती संभाजीनगरातील धावणी मोहल्ल्यात दोन गट भिडल्याने मध्यरात्री तणाव, ३० जणांवर गुन्हा

By सुमित डोळे | Updated: July 31, 2025 13:53 IST2025-07-31T13:50:57+5:302025-07-31T13:53:59+5:30

या वेळी झालेल्या मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत, एकावर तलवार हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे

Tension prevails at midnight as two groups clash in Dhawani Mohalla in Chhatrapati Sambhaji Nagar, 30 people charged with a crime | छत्रपती संभाजीनगरातील धावणी मोहल्ल्यात दोन गट भिडल्याने मध्यरात्री तणाव, ३० जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगरातील धावणी मोहल्ल्यात दोन गट भिडल्याने मध्यरात्री तणाव, ३० जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील धावणी मोहल्ला परिसरात बुधवारी (दि. ३०) रात्री दोन गटांत वाद पेटल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. यामध्ये झालेल्या मारहाणीत दोन तरुण जखमी झाले असून, एका तरुणावर तलवारीने हल्ला झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहम्मद कैफ शेख (वय २१, रा. लोटा करंजा, मरकज मस्जिदजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री अकरा वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ते आणि त्यांचा मित्र दानिश चहा पिण्यासाठी जात असताना त्यांना एक तरुण मारहाण होत असलेला दिसला. दया आल्यामुळे त्यांनी त्याला मदतीसाठी त्यांच्या दुचाकीवर बसवून अंगुरीबाग परिसरात नेले. मात्र, तिथे अचानक उमेश नावाचा युवक धावत आला आणि त्या तरुणाला पुन्हा मारहाण करू लागला.

फिर्यादीने कारण विचारताच उमेशने त्याला ढकलून गालावर जोरात थप्पड मारली. त्यानंतर आरोपी लछु पैलवान, लल्ला, साहील व आणखी ३० ते ३५ जण तेथे जमा झाले आणि त्यांनी दोघांनाही जबर मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला त्यांच्या घरात ओढून नेले आणि घरात बंद करून ठेवले. यावेळी आरोपी उमेशने वरच्या मजल्यावरून लोखंडी तलवार आणून धमकावले व हातातील कड्याने फिर्यादीच्या नाकावर जोरात फटका मारला, त्यामुळे नाकातून रक्तस्राव झाला. त्यानंतर घरात येणारे इतर लोक दोघांवर वारंवार मारहाण करून निघून जात होते. लछु पैलवानने दरवाजा बंद करून बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे, सिटी चौक पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ दंगा काबू पथक तैनात करण्यात आले. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनुचित प्रकार टळला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम 118(2), 115(2), 127(2), 352, 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 तसेच भा.का. 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि भागवत मुठाळ करत आहेत.

Web Title: Tension prevails at midnight as two groups clash in Dhawani Mohalla in Chhatrapati Sambhaji Nagar, 30 people charged with a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.