नारेगावात रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना तणाव; पोलिसांचा लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:05 IST2025-08-05T16:59:21+5:302025-08-05T17:05:01+5:30
नारेगावात व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला मारहाण, पोलिसांनी लाठीमार करून जमावास पिटाळले

नारेगावात रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना तणाव; पोलिसांचा लाठीमार
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने सोमवारी नारेगावात रस्ता रुंदीकरण कारवाई करताना घराच्या पायऱ्या काढण्यावरून झालेल्या वादात मनपाच्या नागरी पथकाच्या जवानांनी तरुणाची कॉलर पकडून लाथांनी मारहाण केली. यामुळे अतिक्रमण मोहिमेत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. मात्र,या वादाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी ३:३० ते ४ या दरम्यान हा धिंगाणा झाला.
मुख्य रस्त्यावरील रहिवासी कादर शाह यांच्या घराच्या पायऱ्या काढून नारेगाव परिसरात ४ ऑगस्ट रोजी मोहिमेला सुरुवात झाली. शाह यांच्या मुलांनी रहिवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत असल्याचे सांगत पायऱ्या न काढण्यास विरोध केला. जेसीबी चालकाला पुढे जाण्यास स्थानिकांनी मज्जाव केला. मात्र, तेथेच वादाची पहिली ठिणगी पडली आणि मनपाच्या नागरी मित्र पथकांनी शाह यांच्या मुलाची कॉलर पकडून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र रस्त्यावर पडलेल्या तरुणाला लाथा घातल्या.
पोलिसांनी मध्यस्थी करत घरात नेले
पोलिसांनी तरुणाला जमावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही नागरी मित्र पथकाच्या एका कर्मचाऱ्याने तरुणाची कॉलर पकडून ठेवल्याने पोलिस संतापले. पोलिसांनी त्याला घरात नेऊन बसवले. या वादात दगड फेकल्याचेही स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी मात्र याचा इन्कार केला.
पुन्हा वाद पेटल्याने सौम्य लाठीमार
या धिंगाण्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी सर्वांना हुसकावून लावले. या सर्व घटनेचे एक स्थानिक तरुण मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होता. एका अल्पवयीन मुलासह शाह यांच्या मुलाने पुन्हा घराबाहेर येत त्याला मारहाण केली. निरीक्षक गजानन कल्याणकर, अंमलदार विजय तेलुरे यांनी तत्काळ धाव घेतली. त्यांच्यासमोरही तरुणाला कानशिलात मारण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांसह जमावावर लाठीमार केला.
असा होता पोलिसांचा बंदोबस्त
१ पोलिस उपायुक्त, १ सहायक पोलिस आयुक्त, ४ पोलिस निरीक्षक, १० सहायक निरीक्षक, ४ निरीक्षक, १५० अंमलदारांसह दंगा काबू पथक व शीघ्र कृती दलाचे जवान मिळून जवळपास ३०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
जमाव, परिसर पाहून निर्णय घ्यावा लागतो
पाेलिसांना त्यांच्या परिसराची जाण असते. जमाव, परिसर व परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. कोणी ऐकत नाहीये, नाहक वाद घालत असेल तर पोलिसांना परिस्थिती हाताळू द्यावी. कॉलर पकडल्याने वाद वाढला व परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मनपाच्या नागरी मित्र पथकाला मारण्याचा अधिकार नाही. त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.