स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:30 IST2025-08-01T14:20:55+5:302025-08-01T14:30:02+5:30

पुंडलिकनगर पोलिसांची शोधासाठी धावाधाव; कोणाला आढळल्यास कळवण्याचे पोलिसांचे आवाहन

Tension after missing school bus, fearing parents and teachers, boy leaves home | स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले

स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले

छत्रपती संभाजीनगर : उशिरा उठल्याने आठवड्याभरात तीन वेळा स्कूल बस सुटली. त्यावरून कुटुंबाने त्याला समजावूनही सांगितले. मात्र, बुधवारी देखील अवघ्या सात मिनिटांच्या फरकाने बस सुटल्याच्या तणावातून १४ वर्षीय इंद्रसेन गजानन देशमुख हा घरी परतलाच नाही. या घटनेला ४८ तास उलटले असून इंद्रसेन बेपत्ताच झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली. त्याच्या शोधासाठी पुंडलिकनगर पोलिसांसह कुटुंबाची गुरुवारी रात्रीपर्यंत धावाधाव सुरू होती.

कृषी यंत्रांचे व्यापारी गजानन देशमुख कुटुंबासह तापडिया पार्कमध्ये राहतात. त्यांचा १४ वर्षीय मुलगा इंद्रसेन शाळेत बसने ये-जा करतो. ३० जुलै रोजी इंद्रसेन शाळेसाठी घराबाहेर पडला. मात्र, दुपारी ३ वाजूनही तो परतला नाही. चिंताग्रस्त आईने शाळेत संपर्क साधल्यावर शिक्षकांनी तो शाळेत आला नसल्याचे सांगितले. बसचालकाने देखील तो बसमध्ये आलाच नसल्याचे सांगितले. यामुळे देखमुख कुटुंब पुरते घाबरून गेले. त्यांनी तत्काळ पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्याकडे तक्रार केली. अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांनी तत्काळ त्याचा शोध सुरू केला.

रागावण्याची भीती
इंद्रसेनची बस साधारण ६:५० पर्यंत घरापर्यंत जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत इंद्रसेनकडून काही मिनिटांच्या उशिरामुळे बस सुटली. त्यावरून आई-वडिलांनी त्याला समजावून सांगितले. बुधवारी देखील ६:५० वाजता बस येऊन गेली. तर इंद्रसेन ६:५७ वाजता पोहोचला. तोपर्यंत बस गेल्याचे कळताच तो तणावाखाली गेला असावा. आता आई-वडील, शिक्षकही रागावतील, या भीतीनेच तो निघून गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पाचोडपर्यंत शोध
पोलिस तपासात इंद्रसेन घरातून थेट सिडको बसस्थानकावर पोहोचला. तेथे एकाला बीडला जायचे असल्याचे सांगत मदत मागत पाचोडपर्यंत पोहोचला. तेथून पुढे तो कुठे गेला, हे कळले नाही. तो मनाने गेला की त्याला पुढे पळवले गेले, याचा पोलिस तपास करत आहेत.

काय म्हणतात मानसोपचारतज्ज्ञ?
माझं कोणीच ऐकत नाही, मला समजून घेत नाही, घेणार नाही, ही भावना निर्माण झाल्यावर मुले असे पाऊल उचलण्याची शक्यता असते. इतर मुलांकडून चिडणे, शिक्षकांच्या रागावण्याच्या भीतीने निराशेत समजून घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मुले घर सोडतात. नैराश्य, चिंता आणि असुरक्षिततेची भावना सतावत राहते. अशा प्रकरणात पालकांनी शांतपणे, एकांतात मुलांशी संवाद साधायला हवा. मुलांच्या भावना समजून घ्याव्यात. प्रेमाने, समजुतीने आणि सकारात्मकतेने मार्गदर्शन करावं. आपली बाजू समजून घेतली जातेय, ही भावना मुलांमध्ये निर्माण हाेणे अत्यंत आवश्यक असते. चिडचिडपणा, राग वाढत असल्यास तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावे.
- संदीप शिसाेदिया, मानसोपचारतज्ज्ञ.

Web Title: Tension after missing school bus, fearing parents and teachers, boy leaves home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.