झटपट श्रीमंत होण्याच्या मोह अंगलट; दुप्पट बिटक्वॉईनच्या आमिषाने व्यापाऱ्याने १० लाख गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:47 IST2021-02-15T13:43:12+5:302021-02-15T13:47:48+5:30
Bitcoin fraud crime news दीपेंद्र शर्माने झटपट श्रीमंत होण्यासाठी पटेल यांना बिटक्वॉईनची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले आणि पटेल त्याच्या जाळ्यात अलगद अडकत गेले.

झटपट श्रीमंत होण्याच्या मोह अंगलट; दुप्पट बिटक्वॉईनच्या आमिषाने व्यापाऱ्याने १० लाख गमावले
औरंगाबाद : शहरातील एका व्यापाऱ्याला बिटक्वॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास काही दिवसांत दुप्पट बिटक्वॉईन देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांनी तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्रेयनगर येथील रहिवासी दीपक हंसराज पटेल हे मागील १०-१५ वर्षांपासून सोशल मीडियावर मार्केटिंग आणि कन्सलटन्सी चालवतात. त्यांनी सन २०१८ मध्ये एका ॲपच्या साहाय्याने २० बिटक्वॉईन ही क्रिप्टो करन्सी खरेदी केले. यासाठी त्यांनी आपल्या ‘आयसीआयसीआय’ या बँकेतील खात्यातून नऊ लाख ५० हजार रुपये खर्च केले. सन २०१९ मध्ये त्यांनी बिटमेक्स या क्रिप्टो करन्सी एक्सचेंजर काही बिटक्वॉईन टाकून खरेदी-विक्री सुरू केली. याच दरम्यान पटेल यांची ‘टेलिग्राम’ या सोशल मीडियावर दीपेंद्र शर्मासोबत ओळख झाली. काही दिवसांनी दीपेंद्र शर्माने पटेल यांना सांगितले की, आपण ट्रेड नाईट क्रिप्टो सिग्नल हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी सोशल मीडियावर मार्केटिंग करायची असून, तुमची मदत लागेल. शर्माने झटपट श्रीमंत होण्यासाठी पटेल यांना बिटक्वॉईनची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले आणि पटेल त्याच्या जाळ्यात अलगद अडकत गेले.
शर्माच्या सांगण्यानुसार पटेल यांनी २३ आणि ३१ डिसेंबर २०१९ रोजी १७ बिटक्वॉईनची गुंतवणूक केली. या मोबदल्यात शर्माने ‘टेलीग्राम’ या सोशल मीडियावर मार्च २०२० मध्ये ३४ बिटक्वॉईन देण्याची थाप मारली; परंतु पटेल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी शर्माने २५ मार्च २०२० रोजी ५ बिटक्वॉईन परत केले. त्यानंतर शर्माकडे वारंवार संपर्क साधून उर्वरित बिटक्वॉईन देण्याची मागणी केली. तेव्ही एप्रिल महिन्यात शर्माने ५.४२ बिटक्वॉईन परत केले. त्यानंतर उर्वरित २४ बिटक्वाईन परत करण्यासाठी शर्माने बिटक्वॉईनचा लाभ कसा मिळतो, यासंबंधीचा एक व्हिडिओ तयार करून पाठवावा लागेल, अशी पटेलकडे मागणी केली. त्यानुसार पटेलने तसा व्हिडिओ करून त्याला पाठवला. त्यानंतर शर्माकडे बिटक्वॉईनची मागणी केली तेव्हा त्याने पटेल यांना धमकी दिली की, यापुढे बिटक्वॉईची वारंवार मागणी केली, तर तुझा व्हिडिओ, मोबाइल क्रमांक व आयपी क्रमांक सोशल मीडियावर शेअर करुन सांगेन की, हाच दीपेंद्र शर्मा आहे आणि मी सर्वांचे बिटक्वॉईन घेऊन पळून जाईन. त्यानंतर त्याने पटेल यांना ‘टेलीग्राम’वर ब्लॉक केले व तो पळून गेला.
... आणि मुंबईत झाला गुन्हा दाखल
ऑक्टोबर २०२० मध्ये फेडरिको गोईल्हर्म बोरोझो दोस सान्तोस (रा. ब्राझील) याने पटेल यांना ‘टेलीग्राम’वर चॅटिंग करून तूच दीपेंद्र शर्मा आहेस. माझे बिटक्वॉईन परत केले नाही, तर तुझ्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली व त्याने अंधेरी पूर्व गुन्हे शाखेत ३५० बिटक्वॉईन चोरल्याची तक्रार दाखल केली व पटेल यांना धमकावत १७ बिटक्वॉईन काढून घेतले.
वकिलानेही दहा लाखाला गंडविले
सान्तोस याचा चेन्नई येथील वकील अभिमन्यू एस. याने पटेल यांना संपर्क साधून ही केस आपणास मिटवायची असेल, तर दहा लाख रुपये द्यावे लागतील. त्यानुसार पटेल यांनी त्याच्या खात्यावर आपल्या दोन बँक खात्यातून द्हा लाख रुपये पाठविले.