चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:27 AM2021-11-29T11:27:34+5:302021-11-29T11:31:20+5:30

आवक-जावकला बदली झाल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता.

Talathi commits suicide by writing four-page suicide note; Mentioning names of revenue officers | चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख

चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख

googlenewsNext

औरंगाबाद : तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत एका तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. लक्ष्मण नामदेव बोराटे (वय ४०, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

औरंगाबाद तहसील कार्यालयात लक्ष्मण बोराटे कार्यरत होते. त्यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनाचा विभाग होता. या विभागातून काही दिवसांपूर्वीच आवक-जावकला त्यांची बदली झाली. त्या ठिकाणीही त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या छळाला कंटाळून त्यांनी राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. बोराटे हे वृद्ध आई, पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासह राहत होते. त्यांची पत्नीही बँकेत नोकरीला असून, ती मुलासह माहेरी गेली होती. आई खालच्या खोलीत असताना त्यांनी वरच्या खोलीत गळफास घेतला. ही घटना सकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील कऱ्हाळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लक्ष्मण बोराटे यांना नातेवाइकांच्या मदतीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार देविदास राठोड करीत आहेत.

सीबीआय चौकशी करा
तलाठी लक्ष्मण बोराटे यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या नोटमध्ये तहसीलदार व इतर अशा १३ अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यात काही सहकाऱ्यांचाही समावेश आहे. वरिष्ठ अधिकारी नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यासाठी पैशांची मागणीही केली जात होती. त्यामुळे या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करावी, असा उल्लेखही नोटमध्ये असल्याचे समजते. बोराटे यांच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगही असल्याची माहिती समोर आली आहे.

नातेवाइकांचा मृतदेह घेण्यास नकार
सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. या मागणीसाठी सातारा पोलीस ठाण्यात रात्री साडेआठ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने जमाव जमला होता. नातेवाइकांनी घाटीत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासही नकार दिला. पोलीस ठाण्यात निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिठ्ठी वाचून दाखवली
पोलिसांनी जप्त केलेली सुसाईड नोट देण्याची मागणी नातेवाइकांनी पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी नकार दिला. नातेवाइकांच्या हट्टामुळे शेवटी पोलिसांनी मृताच्या पत्नीला चिठ्ठी वाचून दाखवली. संबंंधितांवर चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिले.

सर्वांची चौकशी होणार 
आत्महत्या केलेल्या ठिकाणी चार पानाची चिठ्ठी सापडली आहे. त्याची चौकशी पोलीस करीत आहेत. चिठ्ठीत उल्लेख असलेल्या सर्वांची चौकशी केली जाईल. त्यात संबंधितांचा सहभाग आढळल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- सुरेंद्र माळाळे, निरीक्षक, सातारा पोलीस ठाणे.

Web Title: Talathi commits suicide by writing four-page suicide note; Mentioning names of revenue officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.