फेरनोंदणीसाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:38 IST2025-08-07T19:37:56+5:302025-08-07T19:38:50+5:30
लोणी खुर्द येथील झेरॉक्स दुकानात एसीबीची सापळा रचून कारवाई

फेरनोंदणीसाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ अटकेत
शिऊर : वैजापूर तालुक्यांतर्गत लोणी खुर्द येथे एका झेरॉक्स दुकानात दोन हजारांची लाच घेताना अंचलगाव सज्जा येथे कार्यरत तलाठी गोविंद रामचंद्र सबनवडा (वय ५४, रा. ताराराम सोसायटी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. ६) दुपारी २ वाजता करण्यात आली.
तक्रारदाराच्या (वय ५३) वैजापूर तालुक्यातील बाभूळतेल येथील गट क्र. २४२ मध्ये वडिलोपार्जित ५२ आर. क्षेत्राच्या फेरनोंदणीसाठी १८ सप्टेंबर २०२३ रोजी आईच्या नावे कागदपत्रांची फाईल तलाठी सबनवाड याच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, फेरनोंदणीसाठी नोटीस काढून सातबाऱ्यावर नाव लावून देण्यासाठी सबनवाड त्यांने दोन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीने तक्रारीची शहानिशा केली. यानंतर लोणी खुर्द येथील श्रीकृष्ण मल्टी सर्व्हिस या झेरॉक्स दुकानात तक्रारदाराकडून लाचेचे दोन हजार रुपये स्वीकारताना तलाठी सबनवाड याला एसीबीने रंगेहाथ पकडले.
त्याच्या अंगझडतीत रेडमी मोबाइल, ६३९० रुपये रोख रक्कम आणि २,००० रुपयांची लाच हस्तगत करण्यात आली आहे. मोबाइल जप्त केला असून, त्याची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर आरोपीच्या राहत्या घरीदेखील झडती सुरू आहे. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसीबी विभागाकडून करण्यात येत आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी..
पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनात उपधीक्षक उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, निरीक्षक वाल्मीक कोरे, अंमलदार भीमराज जीवडे, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे यांनी ही कारवाई केली.
तीन दिवसांत दुसरा लाचखोर तलाठी जाळ्यात
पैठण तहसील कार्यालयात सोमवारी (दि. ४) एसीबीने तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे यांना वाटणीपत्रासाठी १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याच्या तिसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा लोणी खुर्द येथे सातबाऱ्यावर नावांची नोंद घेण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना पकडला.