झोपेसाठी सर्रास गोळ्या घेताय? रक्तदाब, हृदयरोगाचा होऊ शकतो धोका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:13 IST2025-02-28T17:12:53+5:302025-02-28T17:13:21+5:30
दिवसभर संगणक आणि मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावल्याने झोपेचे चक्र बिघडले आहे

झोपेसाठी सर्रास गोळ्या घेताय? रक्तदाब, हृदयरोगाचा होऊ शकतो धोका !
छत्रपती संभाजीनगर : वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि मोबाइलच्या विळख्यात अडकलेल्या दिनचर्येमुळे अनेकांना झोपेच्या समस्या भेडसावत आहेत. झोप येत नाही, म्हणून अनेक जण सर्रास झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, या गोळ्यांचे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन केल्याने रक्तदाब, हृदयरोगाची शक्यता बळावते, असे तज्ज्ञांनी म्हटले.
मोबाइल, टीव्हीने उडाली झोप
दिवसभर संगणक आणि मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावल्याने झोपेचे चक्र बिघडते आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठण्याची वेळ सांभाळण्याच्या प्रयत्नात शरीर थकल्यासारखे वाटते. झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे थकवा आणि चिडचिड वाढते.
डोक्यात डिग्री, ‘पॅकेज’ची गणितं!
महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा आणि भविष्यातील करिअरच्या चिंता करत रात्रभर अभ्यासात व्यग्र राहतात, तर नोकरदार वर्ग सतत उच्च वेतन, पदोन्नती, कामाच्या तणावाचा सतत विचार करत असतात. डोक्यात डिग्री आणि पगाराच्या आकड्यांची गणितं सुरू असल्यानेही झोपेवर परिणाम होते.
अपुरी झोप, तणावामुळे व्यसनाधीनता
अपुरी झोप आणि वाढता तणाव यामुळे अनेक जण मद्यपान, सिगारेट आणि झोपेच्या गोळ्यांसारख्या गोष्टींमध्ये आधार शोधू लागतात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
डॉक्टर, झोप येत नाहीय; औषध लिहून द्या!
‘डॉक्टर, झोप येत नाहीय; काही औषध लिहून द्या,’ असा आग्रह अनेक जण स्वत:हूनच डाॅक्टरांकडे धरतात. सुरुवातीला या गोळ्या तणावमुक्त झोप देतात. मात्र, त्यांचा दीर्घकालीन परिणाम शरीरावर होऊ शकतो.
झोपेच्या गोळ्यांमुळे रक्तदाबावर परिणाम
अनेक संशोधनांनुसार झोपेच्या गोळ्यांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. या गोळ्यांमुळे मेंदूवरील नैसर्गिक न्यूरोट्रान्समीटर क्रियाशीलता प्रभावित होते. परिणामी, हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
हृदयरोगाची शक्यता; मेंदूवर परिणाम
झोपेच्या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास हृदयरोगाची शक्यता वाढते. हृदयाचे ठोके अनियमित होणे, रक्तदाब वाढणे आणि मानसिक क्षमता कमी होणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. या औषधांचा प्रभाव मेंदूवरही पडतो. स्मरणशक्ती कमी होणे, सतत गुंगी येणे, मानसिक आरोग्यावर परिणाम होणे, अशी स्थिती निर्माण होते.
तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या नको
झोपेच्या अडचणी शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही समस्यांशी निगडित आहेत. झोपेच्या समस्या मानसिक आरोग्याच्या स्थितीत योगदान देऊ शकतात किंवा वाढवू शकतात आणि इतर मानसिक आरोग्य स्थितींचे लक्षण असू शकतात. झोपेच्या विकारांवर औषधोपचार खरच महत्त्वाचे आहेत; पण मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ती घेतली पाहिजे.
- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ