भरधाव एसयूव्ही पुलावरून कोसळून दोघेजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:03 IST2020-02-10T17:58:21+5:302020-02-10T18:03:18+5:30
चोरवाघालगाव शिवारातील घटना

भरधाव एसयूव्ही पुलावरून कोसळून दोघेजण जागीच ठार
वैजापूर : भरधाव जाणारी एसयूव्ही जीप पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ( दि. ९) रात्री ९.४५ च्या सुमारास तालुक्यातील वैजापूर-गंगापूर राज्य महामार्गावरील चोरवाघालगाव शिवारात घडली. विक्रम वामनराव कुलथे (५५) व चांगदेव पुंजाराम गायकवाड(५५) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरहून औरंगाबादकडे एक एसयूव्ही जीप जात होती. दरम्यान चोरवाघलगाव शिवारात समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाचा प्रखर प्रकाशझोत चालकाच्या डोळ्यावर पडल्याने त्याला समोरचा रस्ता दिसेनासा झाला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट पुलावरून खाली कोसळली. यात जीपमधील विक्रम कुलथे व चांगदेव गायकवाड हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक आकाश जाधव (२८) व योगेश पंडित (३३) हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयात कळविले. त्यानंतर आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. रुग्णवाहिकेतील वैदकीय अधिकारी डॉ.अंजर शहा व चालक अनिल सुरासे या दोघांनी नागरिकांच्या मदतीने मृत दोघांसह जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती ढाकणे यांनी यातील दोघांना तपासून मृत घोषित केले. आकाश जाधव व योगेश पंडित या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली नव्हती.
सध्या या भागात राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी संबंधीत ठेकेदाराने काम सुरू असताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली नाही. महामार्गावर काम सुरु असलेल्या ठिकाणी दिशादर्शक किंवा सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.