लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:29 IST2025-06-04T18:28:48+5:302025-06-04T18:29:38+5:30

तपास आंबेजोगाई, नांदेडच्या दिशेने, पोलिसांचे दोन पथके रवाना; सर्व आरोपींच्या घरांची पुन्हा एकदा कसून झाडाझडती

Suspicion that the accused in the Ladda robbery case kept the gold with a person from Nanded | लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय

लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील काही सोने आरोपींनी नांदेडच्या एका व्यक्तीकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे याला सोबत घेत पथके नांदेड व आंबेजोगाईच्या दिशेने तपासासाठी रवाना झाली. दरम्यान, आरोपी सुरेशची पत्नी बबिता गंगणे हिची न्यायालयाने मंगळवारी हर्सूल कारागृहात रवानगी केली.

लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्यात लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांविषयी पोलिस अद्यापही संभ्रमात आहेत. अटकेतील १२ आरोपींच्या चौकशीत अपेक्षित माहितीच पोलिसांना मिळालेली नाही. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या जवळील व्यक्तींची लवकरच चौकशी केली जाणार असल्याने त्यातून ठोस हाती लागण्याची शक्यता पोलिसांना आहे. दरम्यान, दरोड्यानंतर गंगणेने बहुतांश सोने आठ लाख रुपयांत परिचयातीलच सराफा व्यावसायिकाला विकले. ती रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्या व्यतिरिक्त गंगणेच्या माध्यमातून अमोलने नांदेडमधील एका व्यक्तीला कॉल करून सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन पथके तत्काळ त्या दिशेने रवाना झाली.

अखेर पावत्या सादर
लुटलेल्या दागिन्यांच्या पावत्या सादर करण्यासाठी लड्डा यांनी वेळ मागितला होता. मंगळवारी दुपारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी लड्डा यांच्याकडे दरोड्याच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरे केली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी सर्व दागिन्यांच्या पावत्या सादर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीआयडीकडून जबाब नोंदवणे सुरू
दरोड्यातील प्रमुख आरोपी अमोल खोतकर याचे २६ मे रोजी एन्काऊंटर झाले. या प्रकरणी सीआयडीचे पथक तपास करत आहे. एन्काउंटरदरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पाच अधिकाऱ्यांचे आत्तापर्यंत जबाब नोंदवल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोपींच्या घराची झाडाझडती
तपासादरम्यान अमोलच्या एन्काउंटरमुळे पोलिसांच्या मूळ तपासावर मोठा परिणाम झाला. अमोलच्या घरझडतीव्यक्तिरिक्त अन्य आरोपींच्या कुटुंबाची अपेक्षित चौकशीदेखील झाली नव्हती. त्यामुळे सर्व आरोपींच्या घरांची पुन्हा एकदा झाडाझडती घेऊन कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. मंगळवारी काही आराेपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली.

Web Title: Suspicion that the accused in the Ladda robbery case kept the gold with a person from Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.