संशय अन् रागाने केला घात; क्लासमेटसोबत दिसल्यामुळे तरुणीस एकतर्फी प्रेम करणाऱ्याने संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:43 IST2022-05-23T18:42:53+5:302022-05-23T18:43:23+5:30
पाच मिनिटे बोलायचे असल्याची शपथ देऊन तरुणीला कॅफेबाहेर आणले आणि केले चाकूने वार

संशय अन् रागाने केला घात; क्लासमेटसोबत दिसल्यामुळे तरुणीस एकतर्फी प्रेम करणाऱ्याने संपवले
औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत ऊर्फ कशीश ही तीन मित्र आणि मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी गेली असता, तिला पाहण्यासाठी आलेल्या शरणसिंग सेठी याने संशयातून पाच मिनिटे बोलायचे असल्याची शपथ देऊन कॅफेबाहेर आणले. बाहेर येताच त्याने ‘मेरी नहीं हो सकती तो किसी की भी नहीं हो सकती’ या डायलॉगप्रमाणे २०० फूट ओढत नेऊन गळा चिरला. गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांच्या मदतीने शरणसिंग सेठीला (२०) चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या.
देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या सुखप्रीत ऊर्फ कशीश कौर प्रीतपालसिंग ग्रंथी (१८) या विद्यार्थिनीची रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शनिवारी दुपारी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यामुळे शहरासह राज्य हादरून गेले होते. आरोपीला गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तो कशीशवर मागील पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. तो दहावी नापास झाल्यानंतर गॅरेजवर कामाला लागला. कशीशने बारावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात बीबीएला प्रवेश घेतला. महाविद्यालयात ती मित्र-मैत्रिणींसोबत राहायची.
शरणला त्याच्या मित्राने कशीशची मैत्री तीन मुलांसोबत जमली असून, तुला आता ती मिळणार नसल्याचे सांगितले. तो तिच्यावर सतत पाळत ठेवून होता. महाविद्यालयात जाऊन तिची चौकशी करण्याचा प्रयत्न करीत होता. शनिवारीही कशीश महाविद्यालयात आल्यानंतर तो तिच्या मागेच आला. महाविद्यालयाच्या गेटबाहेरील एका कॅफेमध्ये कशीश तीन मित्र आणि मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी गेली होती. तो मागेच आला. कशीशचे त्या तीन मुलांसोबत प्रकरण असल्याचा त्याला संशय होता. या संशयातूनच त्याने कशीशला शपथ घालून पाच मिनिटे बाेलायचे असल्याचा बहाणा करून कॅफेबाहेर बाेलावून घेतले.
कशीश बाहेर आल्यानंतर त्याने तिच्यावर संशय व्यक्त केला. तेव्हा तिने त्यास नकार देत निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे त्याने तिला कॅफेसमोरच २०० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या दिशेने ओढत नेले. माझी होऊ शकत नाहीस तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत सोबत असलेल्या हत्याराने तिच्यावर १८ वार केल्याची माहिती शरणने पोलिसांना दिली.
असा पोहोचला लासलगावला
शरणने कशीशचा खून केल्यानंतर, दुचाकी कॅफेसमोर सोडून पळ काढला. शरणला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आणि वेदांतनगरचे निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वात प्रत्येकी दोन पथके तैनात होती. शरणने पायी चालतच माळीवाडा भागातून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग गाठला. महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमध्ये बसून त्याने ट्रक बदलत लासलगाव गाठले. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल मस्के यांचे पथक शरणची बहीण असलेल्या लासलगावात शनिवारी सायंकाळीच पोहोचले. पथकाने बहिणीसह तिच्या पतीला शरण आल्यानंतर कळविण्यास सांगितले. शरण मनमाडच्या दिशेने जाऊ शकतो, असा संशय असल्यामुळे पथक मनमाडला रात्री गेले. त्याठिकाणी गुरुद्वारामध्ये शरण आल्यास माहिती देण्यास सांगितले. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शरणसिंग बहिणीच्या घरी पोहोचला. याची माहिती समजताच लासलगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. तोपर्यंत गुन्हे शाखेचे पथकही पोहोचले होते. या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला औरंगाबादेत आणले.
शरण पोहोचताच भाऊजींनी कळवले
शरण बहिणीच्या घरी आल्यानंतर त्याच्या भाऊजींनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकास कळविले. तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास थांबवून ठेवण्याच्या सूचना केल्या. मात्र, तो तेथून पसार होण्याची घाई करीत असल्यामुळे स्थानिक पोलिसांना बोलावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
शरण गुन्हेगारी प्रवृत्तीचा
शरणसिंग हा शीघ्रकोपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानपुरा भागातील काही गुंडांसोबतही त्याची ऊठबस होती. तसेच तो गॅरेजवर कामाला असताना नशापाणी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
घाटी महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यानंतर हरप्रीतसिंग कौर उर्फ कशीशचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर प्रतापनगर येथील स्मशानभूमीत कशीशवर दुपारी तीन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खा. इम्तियाज जलील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाठ, आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.