'अभ्यास करून मोठी अधिकारी हो'; लाडक्या लेकीला फायनान्स व्यावसायिकाची शेवटची चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:16 IST2025-04-15T12:15:59+5:302025-04-15T12:16:39+5:30

फायनान्स व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन

'Study and become a great officer, see you again soon'; A finance professional's letter to his beloved daughter | 'अभ्यास करून मोठी अधिकारी हो'; लाडक्या लेकीला फायनान्स व्यावसायिकाची शेवटची चिठ्ठी

'अभ्यास करून मोठी अधिकारी हो'; लाडक्या लेकीला फायनान्स व्यावसायिकाची शेवटची चिठ्ठी

छत्रपती संभाजीनगर : ४५ वर्षीय फायनान्स व्यावसायिक सुमेश सुरेश महाजन (रा. शारदाश्रम कॉलनी) यांचा त्यांच्या कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सूतगिरणी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री २:३० वाजता घडलेल्या घटनेत प्राथमिक तपासात वैयक्तिक तणावातून ही आत्महत्याच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

महाजन यांचे सूतगिरणी चौकात कार्यालय होते. रविवारी दुपारी त्यांनी घरी जेवण केले. त्यानंतर कामासाठी कार्यालयात गेले. रात्रीपर्यंत कार्यालयात कामही केले. मात्र, नेहमीप्रमाणे १० पर्यंत घरी पोहोचणारे सुमेश १२ वाजेनंतरही घरी परतले नव्हते. १ वाजेच्या सुमारास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. शोधाशोध केल्यानंतर तेथेच सुमेश गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. कुटुंबाने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगरचे निरीक्षक कृष्णा शिंदे, अंमलदार दादाराव राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुलीला शेवटचा काॅल
सुमेश यांनी रात्री ९ वाजता मुलीला कॉल करून विचारपूस केली. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नीने कॉल केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबातील अन्य सदस्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. सुमेश यांची गाडी इमारतीच्या खालीच होती. मोबाइल, गाडीची चावीदेखील कार्यालयातच सापडली. सुमेश यांच्या कार्यालयात मुलीला उद्देशून लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीतील हस्ताक्षराची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून घटनेचा सखोल तपास केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

लाडक्या मुलीसाठी संदेश
तारीख व गणपतीचा मंत्र लिहून सुमेश यांनी लाडक्या मुलीला उद्देशून चिठ्ठी लिहिली. 'तू माझी लाडकी मुलगी आहेस. मला या निर्णयासाठी समजून घे. मी सर्व अडीअडचणींना तोंड देऊन थकलो आहे. बेटा, आत्मविश्वासाने पुढे जा. चांगला अभ्यास करून तू अधिकारी होशील, असे मला वचन दे. आईची काळजी घे. आपण लवकरच पुन्हा भेटू, थँक यू' असा मजकूर त्यांनी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची पत्नी शिक्षिका असून, कुटुंबात दोन मुली, आई असते.

Web Title: 'Study and become a great officer, see you again soon'; A finance professional's letter to his beloved daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.