विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक; सचिन निकमने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 02:36 PM2024-02-27T14:36:21+5:302024-02-27T14:38:07+5:30

विद्यापीठ प्रशासनाने परिसरात आंदोलन करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे पत्रक काढण्यात आले आहे.

Student union aggressive against BAMU university administration; Sachin Nikam took an extreme step | विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक; सचिन निकमने उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक; सचिन निकमने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काही दिवसांपूर्वी तोंडाला भगवे फडके बांधून धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले. तसेच परिसरात आंदोलन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे पत्रक काढण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी आज सकाळी प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी टोकाचे पाऊल उचलत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे नेते सचिन निकम यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे रोजी विद्यापीठात तोंडाला भगवे फडके बांधून काही तरुणांनी धुडगूस घातला होता. त्यांच्यावर कारवाईसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू दालनासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हे नोंदवले. त्याच्या निषेधार्थ २७ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याची परवानगी बेगमपुरा पोलिसांकडे विद्यार्थी नेते सचिन निकम यांनी मागितली होती. मात्र, पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाने परिसरात आंदोलन करण्यास बंदी घातलेली असल्यामुळे परवानगी देण्यास नकार दिला. परवानगी नाकारल्यानंतरही विविध विद्यार्थी संघटनांनी माघार न घेता आज सकाळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धडक दिली. 

विद्यापीठ प्रशासनाचा केला निषेध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आज अधिसभेची बैठक सुरू आहे.  यात २०२४-२५ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. बैठक सुरू असतानाच दुपारी बारा वाजेच्या दरम्यान रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी एसएफआय, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, दामिनी महिला संघर्ष समिती, युवक काँग्रेस आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्य इमारतीसमोर  विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करत आंदोलन सुरू केले.  सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, दिक्षा पवार, जयश्री शिर्के, अतुल कांबळे, प्रशांत बोराडे, संदिप तूपसमुद्रे, प्रा.देवानंद वानखेडे, जयपाल सुकाळे, लोकेश कांबळे, अमरदिप अवचार, विकास रोडे, अमरदिप हिवराळे, जयेश पठाडे, भीमराव वाघमारे, सुमेध बनकर, अक्षय जाधव, रत्नदीप रगडे, मंथन गजहंस, नारायण खरात,मनीषा बल्लाळ, निशिकांत कांबळे,कुणाल भालेराव, सागर ठाकूर आदींनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

अचानक केला आत्मदहनचा प्रयत्न 
कुलगुरू, कुलसचिव यांच्या हिटलरच्या वेशातील प्रतीकात्मक प्रतिमा आंदोलकांनी आणल्या होत्या. विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी करून आंदोलकांनी जोडे मारून प्रतीकात्मक प्रतिमांना दहन केले. दरम्यान, सिनेट सदस्य प्रा.सुनील मगरे, व्यवस्थापन परिषद सदस्य दत्ता भांगे, सुभाष राऊत, हरिदास सूर्यवंशी यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला प्र. कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्यासोबतच्या चर्चेसाठी बोलावून घेतले. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली.  प्रशासनाने आंदोलन दडण्यासाठी ही खेळी केली असल्याचा आरोप करत आंदोलक विद्यार्थी प्रशासकीय इमारती बाहेर आले. याचवेळी बाबासाहेबांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्यात येत आहे. येथे एकाधिकारशाही निर्माण होणे हा महामानवाच्या नावाचा अवमान होत असल्याचा संताप व्यक्त करत आंदोलकांपैकी एक सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत निकम यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. 

Web Title: Student union aggressive against BAMU university administration; Sachin Nikam took an extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.