पक्षाघात फक्त ‘वृद्धांचा आजार’ नव्हे; आता तरुणही धोक्यात! धोका टळतो, 'अशी' घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:39 IST2025-10-29T19:38:10+5:302025-10-29T19:39:07+5:30
जागतिक पक्षाघात दिन विशेष: नियमित व्यायाम करा अन् स्ट्रोकला ठेवा लांब

पक्षाघात फक्त ‘वृद्धांचा आजार’ नव्हे; आता तरुणही धोक्यात! धोका टळतो, 'अशी' घ्या काळजी!
छत्रपती संभाजीनगर : कामाचे प्रेशर, व्यायामाचा अभाव आणि झोपेचा तुटलेला क्रम, हे आधुनिक जीवनाचे अनिवार्य वास्तव बनले आहे, पण याच ताणतणावाच्या जीवनशैलीतून ‘पक्षाघाता’सारखा गंभीर आजार आता तरुणांनाही ग्रासत आहे. एके काळी वृद्धांमध्ये दिसणारा स्ट्रोक आजघडीला ३० ते ४५ वर्षांच्या तरुणांमध्ये वाढतोय. पूर्वी पक्षाघाताचे १०० पैकी ८० टक्के रुग्ण हे वयस्कर असायचे. २० टक्के रुग्ण हे कमी वयाचे असत, परंतु आता ४० ते ५० टक्के रुग्ण हे कमी वयाचे असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी जगभरात २९ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक पक्षाघात दिन’ पाळला जातो. या निमित्ताने या आजाराविषयी जनजागृती केली जाते. या दिनाची यंदा ‘प्रत्येक मिनिट मोलाचा आहे’ ही थीम आहे. पक्षाघात हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे. यात प्रामुख्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे आणि मेंदूत रक्तस्राव होणे, हे दोन प्रकार आहेत. पूर्वी हे प्रमाण मुख्यत्वे वृद्धांमध्ये आढळत असे. मात्र, आता १५ ते ४९ वयोगटांतील तरुणांमध्येही स्ट्रोकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, ताणतणाव, जंक फूड, मद्यपान, धूम्रपान आणि निद्रानाश या जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
या लक्षणांकडे नको दुर्लक्ष
- काही वेळा हात, पाय लुळा पडण्याचा प्रकार होतो.
- चेहरा एका बाजूला पडणे, हेही पक्षाघाताचेच एक लक्षण आहे.
- बाेलताना जीभ अडखळणे, बोलता न येणे हेही पक्षाघाताचे लक्षण आहे.
- शरीराचा अचानक तोल जाणे, संतुलन हरवणे हेही एक लक्षण सांगितले जाते.
धोका टळणे शक्य
योग्य जीवनशैलीचा अवलंब केला, तर पक्षाघाताचा धोका टळू शकतो. वजन नियंत्रणात ठेवावे, नियमित व्यायाम करावा. उच्च रक्तदाब, शुगर नियंत्रणात ठेवावी. सकस आहार घ्यावा. व्यसन टाळावे. पक्षाघाताची लक्षणे दिसल्यावर ‘गोल्डन अवर’ असलेल्या पहिल्या एका तासात उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. पहिल्या एका तासात उपचारासाठी दाखल झाल्यास ८० टक्के रुग्ण बरे होतात.
- डाॅ.पांडुरंग वट्टमवार, न्युरोलाॅजिस्ट.