दलित अत्याचारांच्या घटनांमधील दोषींवर चौकशीनंतर कठोर कारवाई
By Admin | Updated: May 11, 2014 00:11 IST2014-05-11T00:05:33+5:302014-05-11T00:11:18+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवपूळ आणि जालना जिल्ह्यातील खडकी, बाबुलतारा, नानेगाव येथील दलित कुटुंबांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली

दलित अत्याचारांच्या घटनांमधील दोषींवर चौकशीनंतर कठोर कारवाई
औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवपूळ आणि जालना जिल्ह्यातील खडकी, बाबुलतारा, नानेगाव येथील दलित कुटुंबांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, या सर्व घटनांच्या सखोल चौकशीनंतर दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असे रोजगार हमी व जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. रोहयोमंत्री राऊत आणि राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. एल. थूल हे शुक्रवारी औरंगाबाद दौर्यावर आले होते. त्यांनी कन्नड तालुक्यातील देवपूळ गावातील मातंग समाजाच्या उमेश आगळे या खून झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर औरंंगाबादेत सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, नानेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात वेळकाढू भूमिका घेतली. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली ही भूमिका घेतली हे तपासावे लागेल. यामध्ये संबंधित दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल. परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील दलितांना आंबेडकर जयंती साजरी करू न देता अडवणूक करुन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तेथेही पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलली नाहीत. ही सर्व प्रकरणे अत्यंत गंभीर असल्याचे मत नितीन राऊत आणि थूल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात दलित सवर्ण यांच्यातील संघर्षाच्या घटना वाढत असल्यामुळे आपण चिंतित आहोत, असेही ते म्हणाले.