पिटबूलच्या हल्ल्यात भटके गरोदर श्वान गंभीर जखमी, मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:59 IST2025-01-24T16:57:48+5:302025-01-24T16:59:52+5:30
मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे सदस्य सूरज बगळे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पिटबूलच्या हल्ल्यात भटके गरोदर श्वान गंभीर जखमी, मालकावर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : पाळण्यास बंदी असलेल्या पिटबूल प्रजातीच्या श्वानाने दुसऱ्या गरोदर श्वानावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. या प्रकारास त्याच्या मालकाला कारणीभूत ठरवत जवाहरनगर पोलिस ठाण्यात अमरनाथ देवकर व राेहणी अमरनाथ देवकर (रा. काल्डा कॉर्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
२० जानेवारी रोजी सोशल माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात पिटबूल प्रजातीच्या आक्रमक झालेल्या श्वानाने दुसऱ्या छपाक नावाच्या भटक्या श्वानावर हल्ला केला. यात गरोदर असलेली छपाक श्वान गंभीर जखमी झाली. अत्यंत धोकादायक व हिंस्र असलेल्या पिटबूलकडून माणसांसह अन्य पशूंच्या जीवितास धोका पोहोचण्याची दाट शक्यता असते. तरीही त्याचे मालक अमरनाथ देवकर व रोहणी देवकर यांनी त्याला पाळून त्याच्या बाबत निष्काळजीपणा केला. मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे सदस्य सूरज बगळे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पिटबुलचा भटक्या गरोदर श्वानावर भयंकर हल्ला; भटके श्वान गंभीर जखमी, मालकावर गुन्हा दाखल #chhatrapatisambhajinagar#dog#marathwadapic.twitter.com/bywxJDTciK
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) January 24, 2025
पिटबूल प्रजातीचे श्वान पाळण्यासंदर्भात मार्च, २०२४ मध्ये केंद्र सरकारने निर्बंध आणले होते. काही महिन्यांपूर्वीच लखनौमध्ये पाळलेल्या पिटबूलच्या हल्ल्यात एका वृद्धेचा मृत्यू झाला होता. श्वान पाळण्यासाठी मनपाकडे रीतसर नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही शहरात ६० टक्के श्वान मालक याकडे दुर्लक्ष करतात.