अजबच! शिवाजीनगर भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होईना, आता वरून टाकणार पत्र्याचे छत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:58 IST2025-07-25T16:57:08+5:302025-07-25T16:58:01+5:30
पाणी निचरा होण्याचा मार्ग योग्य पद्धतीने करण्यात आला नसल्यानेच हा भुयारी मार्ग पावसात तुंबत आहे.

अजबच! शिवाजीनगर भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होईना, आता वरून टाकणार पत्र्याचे छत
छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गात गेल्या दोन महिन्यात दोनवेळा पाणी साचले. पाणी निचरा होण्याचा मार्ग योग्य पद्धतीने करण्यात आला नसल्यानेच हा भुयारी मार्ग पावसात तुंबत आहे. मात्र, पाणी निचरा होण्याच्या कामाऐवजी भुयारी मार्गावर पत्रे बसवण्याचा प्रयोग केला जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘आजार म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला’ अशी ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.
शिवाजीनगर भुयारी मार्गाचे १५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. मात्र, शहरात १८ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शिवाजीनगर येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि भुयारी मार्गाची पोलखोल झाली. यानंतर रेल्वे प्रशासनासह अन्य यंत्रणांनी युद्धपातळीवर भुयारी मार्गाच्या ठिकाणी पाणी निचरा होण्यासंबंधी काम केले. परंतु, त्यानंतरही १२ जुलै रोजी पुन्हा या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. पाणी निचरा होण्यासंबंधी काम करण्याऐवजी भुयारी मार्गावर पत्रे बसवण्याचा जुगाड केला जात असल्याने आणि त्यासाठी भुयारी मार्गातील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
शहानूरमियाँ दर्गा चौकात खोळंब्याची शक्यता
पाच दिवस शिवाजीनगर भुयारी मार्ग बंद राहणार असल्याने नागरिकांना संग्रामनगर उड्डाणपूल, शहानुरमियाँ दर्गा चौकातून वळसा मारावा लागणार आहे. परिणामी, एकाच चौकावर वाहनांचा भार पडणार असून, येथील वाहतूक खोळंबा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामासाठी भुयारी मार्ग बंद करू नये
पत्रे बसवण्याच्या कामासाठी भुयारी मार्ग बंद करता कामा नये. विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होईल. पत्रे बसवल्यानंतर पाणी साचते की नाही, हे पुढे समोर येईलच. परंतु, हे काम रात्रीही करता येईल. दोन ते तीन दिवसात काम पूर्ण करावे.
- बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती