अजबच! छत्रपती संभाजीनगरजवळची टेकडीच गेली चोरीला, महसूल प्रशासनाला खबरही नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:18 IST2025-12-20T17:16:48+5:302025-12-20T17:18:52+5:30
तहसीलची तक्रारीस टाळाटाळ; पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून केली अटक, पाच दिवस पोलिस कोठडी

अजबच! छत्रपती संभाजीनगरजवळची टेकडीच गेली चोरीला, महसूल प्रशासनाला खबरही नाही
छत्रपती संभाजीनगर : कार, घर, पैसे, सोन्याचे दागिने, वाहन चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे दाखल होतात. आता मात्र चक्क मोठ्या आकाराची टेकडीच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा पोलिस ठाण्यात मूळ जमीन मालक, साताऱ्याचा माजी उपसरपंच आयुब खान जब्बार खान पठाण (रा. सातारा) याच्यावर टेकडी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सातारा गावातील रहिवासी शब्बीर जब्बार पठाण यांनी पोलिसांकडे गावातील गट क्रमांक २४७ मध्ये जमीन मालक आयुब खान याने त्याच्या मालकीच्या जमिनीमधील मोठी टेकडी चोरल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी यात तपास सुरू केला. त्यात आयुब खान याच्या जमिनीवर मोठ्या आकाराची टेकडी होती. मात्र, त्याने मुरूम विक्रीसाठी ती संपूर्ण नष्ट केली. मुरूम, माती, दगड असे हजारो ब्रास गौणखणिज चोरून विक्री केल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी तक्रारीबाबत २९ नोव्हेंबर रोजी अपर तहसील कार्यालयात पत्रव्यवहार केला, तसेच याबाबत पंचनामा करण्याची विनंती केली. त्यावरून ४ डिसेंबर रोजी मंडळ अधिकारी शेखर शिंदे यांनी पंचनामा केला.
१५ हजारांपेक्षा अधिक ब्रास मुरूम, खडी...
मंडळ अधिकारी शिंदे यांच्या अहवालानुसार, सदर गटात आयुब खान याची जवळपास ५ ते ६ एकर शेती असून तिथे टेकडी होती. आयुबने ती अवैधरीत्या जेसीबीच्या साहाय्याने पोखरली. अंदाजे १५ हजारांपेक्षा अधिक ब्रास मुरूम, खडी चोरी करून विक्री केला.
या मुद्यांवर दखलपात्र गुन्हा
-गौणखणिज ही शासनाची मालमत्ता असते. शासनाच्या परवानगीशिवाय ती विकता येत नाही. अवैधरीत्या ते चोरून विक्री करणे दखलपात्र गुन्हा आहे. आयुबने हा इतका मोठा मुरूम कोणाला, का विकला, त्यात किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला? यात मोठ्या रॅकेटचा सहभाग असावा व याच रॅकेटने अन्यत्रही टेकड्या, डोंगर पोखरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
- गौणखनिज चोरी प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी ११ डिसेंबर रोजी अपर तहसीलदार कार्यालयाला पोलिसांनी कळवले. मात्र, १७ डिसेंबरपर्यंत संबंधितांनी कारवाईसाठी कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे पोलिसांनी शासनातर्फे फिर्यादी होत आयुब खानवर गुन्हा दाखल केला.
या कलमाअंतर्गत गुन्हा
आयुब खान वर बीएनएस अंतर्गतच्या चोरीचे कलम ३०३ -२, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ (७), ४८(८) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.