कपाशी बियाणांची विक्री तूर्तास थांबवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:51 IST2018-05-21T16:49:40+5:302018-05-21T16:51:12+5:30

पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

Stop the sale of cotton seeds immediately; Appeal from Aurangabad Zilla Parishad | कपाशी बियाणांची विक्री तूर्तास थांबवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून आवाहन  

कपाशी बियाणांची विक्री तूर्तास थांबवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून आवाहन  

ठळक मुद्देजिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले.

औरंगाबाद : पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्वहंगामी कापूस लागवड टाळणे हे शेतकऱ्यांसाठी हिताचे राहील. मागील वर्षी जिल्ह्यातील सोयगाव व इतर बागायती क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले. मागील काही वर्षांत मे महिन्यातील वाढलेल्या तापमानामुळे जमिनीचे तापमाण वाढत आहे.

मे महिन्याताील उष्णतेमुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसतो. त्यामुळे पूर्वहंगामी कापसाची उगवण व मुळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जमिनीतील प्रचंड उष्णतेमुळे कोवळ्या मुळांच्या पेशींच्या वाढीवर परिणाम झाल्यामुळे मुळाद्वारे अन्नद्रव्यांच्या वहनामध्ये अडचण निर्माण होऊन झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे पानांच्या कडावर लालसर छटा दिसतात. भविष्यात वाढ न होता ती झाडे मरतात. मागील हंगामात २५ मे ते ५ जूनदरम्यान सोयगाव तालुक्यातील पळाशी या गावामध्ये लागवड झालेल्या कापसावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. दुसरीकडे, ५ जूननंतर लागवड झालेल्या कापसाची वाढ  समाधानकारक झाल्याचे दिसून आले.

या दोन्ही कारणांमुळे पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड चालू वर्षात टाळून येणाऱ्या हंगामात पुरेसा पाऊस (५० ते १०० मिमी) झाल्यानंतरच मृग नक्षत्रामध्ये १५ जूनपासून लागवड केल्यास सुवर्णमध्य साधून पिकाच्या वाढीवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येईल. 

१५ जूननंतर कपाशीची लागवड करा
१५ जूननंतर कापसाच्या पिकाची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्थेतून येणाऱ्या पतंगांची पिढी नष्ट होते व या अळीचा प्रादुर्भावही कमी करण्यास मदत होईल.त्यामुळे कृषी विभागाने पूर्वहंगामी कापूस लागवड होऊ नये, यासाठी सद्य:स्थितीत कापूस बियाणांची विक्री थांबविण्याचे आवाहन केले आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार व उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी सांगितले.

Web Title: Stop the sale of cotton seeds immediately; Appeal from Aurangabad Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.