छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:54 IST2025-03-26T18:53:47+5:302025-03-26T18:54:13+5:30

जमावाने अचानक आरडाओरड करीत पथकावर दगडफेक सुरू केली.

Stones pelted on encroachment removal team at Harsool in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव

छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मंगळवारी महापालिकेचे पथक दाखल झाले. सोमवारी १८० घरांची राखरांगोळी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. मनपाने कारवाईला सुरुवात करताच रहिवाशांनी दगडांचा वर्षाव सुरू केला. यामध्ये अतिक्रमण हटाव विभागाचे दोन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हर्सूलच्या गट क्रमांक २१६, २१७ मध्ये गायरान जमीन आहे. यावर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृह प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कंत्राटदाराला वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. जागा मोकळी करून कंत्राटदाराला देण्याचे काम बाकी आहे. या प्रकल्पासाठी अडीच एकर जागा लागणार आहे. या जागेवर अतिक्रमण करून १८० नागरिकांनी घरे थाटली होती. हे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाकडून अनेकदा प्रयत्न झाले. अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शविला. मागील आठवड्यात मनपाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी पाच दिवसांचा वेळ नागरिकांना दिला. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी कारवाई करीत १८० घरे जमीनदोस्त केली. पोलिस बंदोबस्त नसतानाही मनपाने स्वत:च्या बळावर ही कारवाई केली होती.

मंगळवारी सकाळी ११:३० वाजता अतिक्रमण हटाव पथक इमारत निरीक्षक अश्विनी कोथलकर यांच्या नेतृत्वाखाली हर्सूल येथे पोहोचले. ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना साहित्य काढून घेण्याची विनंती केली. जागेचे सपाटीकरण करायचे आहे, असे सांगितले. जमावाने अचानक आरडाओरड करीत पथकावर दगडफेक सुरू केली. अतिक्रमण पथकातील माजी सैनिक गजानन चितळे यांचे डोके फुटले तर रामेश्वर निकम यांच्या पायाला मार लागला. जमाव पथकाकडे येत असल्याचे पाहून पथक तेथून माघारी फिरले. त्यानंतर हर्सूल पोलिस ठाण्यात जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारीच उचलले होते दगड
महापालिकेने सोमवारी हर्सूल येथे अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली असतानाच काही महिलांनी दगड उचलले होते. मात्र, ते भिरकावण्याची हिंमत महिलांनी दाखविली नव्हती. मंगळवारी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाने पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी नागरिकांनी दगडफेक केली. विशेष बाब म्हणजे मंगळवारीही मनपाने पोलिस बंदोबस्त न घेता कारवाई सुरू केली होती.

Web Title: Stones pelted on encroachment removal team at Harsool in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.