शिवणकाम सोडून चोरीत तरबेज! बायकोच्या उत्पन्नाची बरोबरी करण्यासाठी टेलर बनला दुचाकीचोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:30 IST2025-09-04T17:25:01+5:302025-09-04T17:30:02+5:30
गुन्हे शाखेकडून मालेगावचा चोर अटकेत; बार, घाटी रुग्णालयातून चोरलेल्या सात दुचाकी मालेगावातून जप्त

शिवणकाम सोडून चोरीत तरबेज! बायकोच्या उत्पन्नाची बरोबरी करण्यासाठी टेलर बनला दुचाकीचोर
छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या हट्टावरून मालेगावाचा शिवणकामाचा व्यवसाय सोडून शहरात स्थायिक झालेल्या इसमाने अधिकच्या उत्पन्नासाठी चक्क दुचाकी चोरी सुरू केली. घाटी रुग्णालयातून चोरलेल्या एका दुचाकीच्या शोधात गुन्हे शाखेने अताऊर रहेमान निसार अहमद अन्सारी (४०, रा. सिटी चौक) याला अटक केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
शहरात गेल्या आठ महिन्यांतच १ हजारांपेक्षा अधिक दुचाकी चोरीला गेल्या. घाटी रुग्णालयाच्या पार्किंगमधील दुचाकी चोरीची एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी फुटेजवरून तपास सुरू केला. यात चोर सिटी चौक परिसरातील एका रुग्णालयाजवळ दिसला. पथक त्याच्या घरापर्यंत जाईपर्यंत अताऊर मालेगावला गेला होता. बोडखे, अंमलदार योगेश गुप्ता, संताेष भानुसे, विजय घुगे, विक्रम खंडागळे, जालिंदर गोरे, सोमनाथ दुकले यांनी मालेगावमध्ये धाव घेतली. मालेगाव शहर पोलिस ठाण्याचे राहुल घुनावत यांच्या मदतीने त्यांनी अताऊरला अटक केली.
दुचाकी चोरताच मालेगावला जायचा
मूळ मालेगावचा असलेल्या अताऊरचा चार वर्षांपूर्वी शहरातील मुलीसोबत विवाह झाला. लग्नाच्या काहीच दिवसांनी तो टेलरिंगचा कौटुंबिक व्यवसाय सोडून पत्नीसोबत शहरात स्थायिक झाला. त्याची पत्नी रुग्णालयात नोकरीला आहे. टेलरिंगमध्ये पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. गुन्हेगारी मित्रांच्या संगतीमुळे त्याने आठ महिन्यांपूर्वी एका बारसमोरून दुचाकी चोरली आणि त्याची हिंमत वाढत गेली.
ग्राहक दारू पिणे सुरू करेपर्यंत थांबायचा
अताऊरने आठ महिन्यांत घाटी व मनपा परिसरातील बारसमोरून सात दुचाकी चोरून मालेगावला नेऊन ठेवल्या. त्यातील काही विकल्या देखील. बारमध्ये ग्राहकाने आत जाऊन दारू पिण्यास सुरुवात करताच तो त्याची दुचाकी चोरून न्यायचा. घाटीत दुचाकीचालक रुग्णालयाच्या आत जाईपर्यंत पाठलाग करायचा. तो आत व्यस्त झाल्याचे निश्चित झाल्यावर बनावट चावीने तो त्याची दुचाकी चोरून नेई..