कापूस खरेदी केंद्रे सुरू करा
By Admin | Updated: December 31, 2014 01:00 IST2014-12-31T00:48:35+5:302014-12-31T01:00:53+5:30
जालना : शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुलभ होण्यासाठी कॉटन फेडरेशन व पणन महासंघाने समन्वय राखून कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावित

कापूस खरेदी केंद्रे सुरू करा
जालना : शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुलभ होण्यासाठी कॉटन फेडरेशन व पणन महासंघाने समन्वय राखून कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावित, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामांचा आढावा घेत विविध सूचना केल्या.
शेतकऱ्यांना शासनाने वाढीव बोनस जाहीर केला असून त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कापसाचे पैसे त्यांच्या खात्यात आॅनलाईन पद्धतीने अदा करण्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून या परिस्थितीमध्ये नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळण्यासाठी दुरूस्ती व देखभालीअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून २४४ गावांसाठी एकत्रित योजना तयार करावी. सर्वसामान्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही लोणीकर यांनी दिला.
जिल्ह्यात असलेल्या विविध हातपंपावर सोलर एनर्जीवर चालणारे पंप संबंधित यंत्रणांनी तात्काळ बसवावेत. जिल्ह्यातील बरबडा, पाटोदा, खुराड, सावंगी, तळतोंडी, बामणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. या कामी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा मिळवून देण्याबरोबरच या गावातील अपूर्ण असलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. अंगणवाडी, शाळांमधील पोषण आहार, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेश यांची गुणवत्ता तपासून निकषाप्रमाणे सर्व बाबींची खातरमजा करण्यात यावी. अंबड, भोकरदन, परतूर, जाफराबाद या ठिकाणच्या उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योगांना आवश्यक सोयी, सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. खराब रस्त्यांची तातडीने दुरूस्ती, बदनापूर कृषी महाविद्यालयाचा शेतकऱ्यांसाठी उपयोग, शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना चांगली सेवा इत्यादी सूचनाही पालकमंत्री लोणीकर यांनी केल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)