ssc exam : वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून मुलाने दिला दहावीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 16:14 IST2020-03-12T16:12:33+5:302020-03-12T16:14:42+5:30
परीक्षेला जाण्याच्या काही तास आधी झाले निधन

ssc exam : वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून मुलाने दिला दहावीचा पेपर
औरंगाबाद : लाडसावंगी येथून जवळच असलेल्या सिरजगाव (घाटी) येथील दहावीत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. मात्र आज दहावीची परीक्षा असल्याने वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून तो परीक्षेला उपस्थित राहिला.
सिरजगाव (तालुका बदनापूर ) येथील विकास आप्पासाहेब शेजुळ याचा गुरुवारी सकाळी लाडसावंगी येथील परिक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता दहावीचा पेपर होता. विकास सकाळी परीक्षेला जाण्याची तयारी करत असतानाचा सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्याच्या वडिलांचे अप्पासाहेब विठुबा शेजूळ (४२ ) आजारपणामुळे निधन झाले. यामुळे विकास आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेची माहिती लाडसावंगी येथील शाळेतील मुख्याध्यापक गोरख नजन व ज्ञानेश्वर गुंजाळ या शिक्षकांना कळली. त्यांनी लागलीच सिरजगाव येथील ग्रामस्थांसोबत संपर्क करून विकासला परीक्षेसाठी बोलावून घेतले. यानंतर विकासने मनाची तयारी करून परीक्षा दिली. पेपर झाल्यानंतर त्याच्या वडिलांवर अंतिम संस्कार करण्यात आले.