जालना रोडवर वेगाचा थरार; दुचाकीला धडकेनंतर नियंत्रण सुटताच कार उडाली हवेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:50 IST2025-08-06T15:42:04+5:302025-08-06T15:50:02+5:30
सीटबेल्टमुळे कार चालकाचा जीव वाचला; मात्र दुचाकीवरील एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसरा किरकोळ जखमी

जालना रोडवर वेगाचा थरार; दुचाकीला धडकेनंतर नियंत्रण सुटताच कार उडाली हवेत
छत्रपती संभाजीनगर : सिग्नल सुटताच सुसाट वेगात निघालेल्या कार चालकाची दुचाकीला धडक लागली. यामुळे गडबडलेल्या कार चालकाचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटले व ॲक्सिलेटरवर पाय पडून कार थेट दुभाजकावर चढून हवेत उडाली. बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता हायकोर्टासमोर हा अपघात घडला. संदेश जाधव (रा. चैतन्यनगर), असे कार चालकाचे नाव असून, प्रशांत मिसाळ या दुचाकीस्वाराच्या नाक, चेहरा व हाता-पायांना गंभीर दुखापत झाली.
प्रत्यक्षदर्शी व वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास जाधव त्यांच्या कारमधून हायकोर्ट सिग्नल सुटताच वेगात निघाले होते. हायकोर्टपासून काही अंतरावर समोरील एका दुचाकी चालकाच्या सायलेन्सरला त्यांच्या कारचा धक्का लागला. यात दुचाकीस्वार दूरवर फेकला गेला. मात्र, या घटनेमुळे संदेश यांचे कारवरील नियंत्रण सुटले. यातच त्यांनी कार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना वेग आणखी वाढला व कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात अतिवेगामुळे कार थेट दुभाजकावरील झाडाच्या कुंडीवर आदळून हवेत उडत रस्त्याच्या मध्यभागी येऊन पडली. यात कुंडीदेखील मुळापासून तुटून विरुद्ध दिशेला फेकली गेली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
सीटबेल्टमुळे प्राण वाचले, दुचाकीस्वार मात्र जखमी
संदेश यांनी सीटबेल्ट लावलेला असल्याने कार हवेत उडून खाली कोसळूनदेखील त्यांना फार इजा झाली नाही. ते सुरक्षितरीत्या स्वत:हून कारबाहेर आले. मात्र, दुचाकीस्वार प्रशांत हे गंभीर जखमी झाले. कारच्या मागेच असलेले शरद जहागीरदार (रा. कैलासनगर) यांनी दुचाकीस्वारांना बाजूला बसवत त्यांची दुचाकी बाजूला केली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर प्रशांत यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बघ्यांची गर्दी, वाहतूक खोळंबली
अपघातानंतर बघ्यांसोबत मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यांच्या गर्दीमुळे हायकोर्ट सिग्नल ते सेव्हन हिलदरम्यान वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कार रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.