आता बोला! स्मार्ट टीओडी वीज मीटरमध्येही फेरफार; जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:55 IST2025-08-25T14:46:52+5:302025-08-25T14:55:02+5:30

नव्या मीटरमध्ये फेरफारीचा प्रकार; वीजचोरी करणाऱ्या ग्राहकावर गुन्हा दाखल

Speak now! Smart TOD electricity meters also tampered with; Incident in Chhatrapati Sambhajinagar district | आता बोला! स्मार्ट टीओडी वीज मीटरमध्येही फेरफार; जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

आता बोला! स्मार्ट टीओडी वीज मीटरमध्येही फेरफार; जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

छत्रपती संभाजीनगर : महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर सर्वत्र बसवले जात आहेत. टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डेटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची तसेच मीटरमध्ये कुणी फेरफार केला तर त्याची थेट माहिती त्याच क्षणी महावितरणला मिळते. अशा ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर वीजचोरी पकडली जात आहे. जालना जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणने गेल्या काही दिवसात केलेल्या तपासणीत टीओडी मीटरमध्ये वीजचोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली. आता छत्रपती संभाजीनगरातही अशी वीजचोरी पकडण्यात आली.

महावितरणचे सिडको एन-१२ शाखेचे सहायक अभियंता गणेश राठोड हे त्यांचे सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ विकास क्षीरसागर व लोकेश रगडे यांच्यासोबत २ ऑगस्ट रोजी वीजचोरी शोधमोहीम राबवत होते. सिडको एन-११ परिसरातील उमाकांत पेड्डी यांच्या मीटरची तपासणी केली. या ग्राहकाने व्यावसायिक कारणासाठीच्या मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे आढळले. या ग्राहकाने महावितरणचे ५ हजार ८६० रुपयांचे नुकसान केले आहे. या रकमेसह ग्राहकाने २ हजार रुपयांचे तडजोड शुल्कही भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सहायक अभियंता राठोड यांच्या फिर्यादीवरून उमाकांत पेड्डीवर भारतीय विद्युत कायदा २००३च्या कलम १३५ अन्वये सिडको पोलिस ठाण्यात २० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

वीजबिल कमी करण्याचे आमिष, मग सावध...
वीजचोरी हा गंभीर गुन्हा असून, या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी कुणी मीटरमध्ये फेरफार करून वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवत असेल, तर त्याला बळी न पडता त्याची तातडीने महावितरणला माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Speak now! Smart TOD electricity meters also tampered with; Incident in Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.