चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे, जमेल तेथे शोधली घरटी

By साहेबराव हिवराळे | Published: March 21, 2024 06:20 PM2024-03-21T18:20:55+5:302024-03-21T18:21:15+5:30

जवळ गेल्यास भुर्रर्रकन उडून जाणाऱ्या चिमण्या आता माणसांना न भीता परिस्थितीनुसार जगायचे शिकल्या आहेत.

Sparrows also learned to live according to the conditions, found nests wherever possible | चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे, जमेल तेथे शोधली घरटी

चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे, जमेल तेथे शोधली घरटी

छत्रपती संभाजीनगर : लहानपणी आई, आजीच्या गोष्टीमध्ये एक घास चिऊचा, एक घास काऊचा, असे सांगताना अंगणात चिवऽऽ चिवऽऽ करीत चिमण्यांचा थवा यायचा. अन्नाचा कण चोचीने टिपणाऱ्या अन् थोडेसंही जवळ गेल्यास भुर्रर्रकन उडून जाणाऱ्या चिमण्या आता माणसांना न भीता परिस्थितीनुसार जगायचे शिकल्या आहेत. जमेल तेथे त्यांनी घरटी शोधली आहेत.

‘अरे खोप्यामंधी खोपा सुगरणीचा चांगला... देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला’, या बहिणाबाईंच्या कवितेचा अर्थही आशयपूर्ण आहे. चिमण्यांसह पक्ष्यांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी पशुपक्षी बचाव अभियानचे संजय दळवी हे गेल्या ११ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. ते चिमण्यांसाठी अन्न, पाणी, निवाऱ्याची सोय करून देत आहेत. मातीचे मटके तयार करून ते शाळा, बसस्थानक तसेच ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी ठेवतात. या उपक्रमासाठी त्यांनी अनेकांंना सहकार्य करण्यास भाग पाडले आहे.

एक हजार भांडी वाटप
लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या वतीने पक्ष्यांसाठी ‘जल संजीवनी उन्हाळा व्यवस्थापन’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध शाळा व नागरिकांना झाडांना लटकवण्यासाठी एक हजार मातीची भांडी दिली. नागरिक व शाळांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे लाइफ केअर संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांनी सांगितले.

चिमण्यांसाठी युवकांना आवाहन
- चिमण्यांची गणना होणे आवश्यक आहे, त्यामुळे त्या कोणत्या भागात किती प्रमाणात दिसतात, त्यांची घरटी कुठे आहेत, याचा अंदाज घेता येईल.
- निघून गेलेल्या चिमणीला परत बोलवायचे असेल, तर इमारतीच्या भिंतींना बाहेरून पक्ष्यांसाठी निवाऱ्यांसाठी सोय करण्याची सक्ती करावी.
- सोयायटी आवारात झाडे लावावीत
- घराच्या भिंतीला एक तरी देवळी ठेवावी
- कृत्रिम घरटी तसेच अन्न पाण्याची सोय करावी
- चिमण्या खरकटे अन्न, गवत, बिया, धान्य, किटके खातात
- उन्हाळ्यात मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे.
 

Web Title: Sparrows also learned to live according to the conditions, found nests wherever possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.