विट्स हॉटेल लिलावातून मुलगा माघार घेणार; मंत्री शिरसाटांची भूमिका स्पष्ट, विरोधकांना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:12 IST2025-06-02T16:12:02+5:302025-06-02T16:12:27+5:30

“तुम्ही जर खरोखरच इतके प्रामाणिक आहात, तर हे हॉटेल विकत घेऊन दाखवा.” असे आव्हान मंत्री संजय शिरसाट यांनी दिलं

Son will withdraw from Wits Hotel auction; Sanjay Shirsat warns opponents over allegations | विट्स हॉटेल लिलावातून मुलगा माघार घेणार; मंत्री शिरसाटांची भूमिका स्पष्ट, विरोधकांना म्हणाले...

विट्स हॉटेल लिलावातून मुलगा माघार घेणार; मंत्री शिरसाटांची भूमिका स्पष्ट, विरोधकांना म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर: येथील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या लिलावात अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांना उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. “माझ्या मुलाने या हॉटेलच्या लिलावात सहभाग घेतला, पण लिलाव प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांचं खोटं चित्र उभं केलं जात आहे. त्यामुळे मी मुलाला या प्रक्रियेतून माघार घेण्यास सांगणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. “तुम्ही जर खरोखरच इतके प्रामाणिक आहात, तर हे हॉटेल विकत घेऊन दाखवा. मी तुमच्या स्वागतासाठी स्वतः हजर राहीन.” असे थेट आव्हान शिरसाट यांनी विरोधकांना दिलं आहे. 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यावर आरोप करताना, हॉटेल बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी किमतीत म्हणजे ६७ कोटींना मिळाल्याचा दावा केला. रेडीरेकनरप्रमाणे या हॉटेलची किंमत सुमारे ११० कोटी रुपये असल्याचे ते म्हणाले. यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “हा लिलाव कोर्टाच्या आदेशानुसार झाला आहे. सध्याची रक्कम केवळ सुरुवातीची आहे; अंतिम व्यवहार पूर्ण झालेला नाही.” पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, “राजकारणात आरोप करा, मी उत्तर देईन. पण वैयक्तिक आरोप केले, तर मीही तुमच्यावर माहिती उघड करीन. तुमच्या दलालीपासून ते स्टोऱ्यांपर्यंत सर्व काही माझ्याकडे आहे.”

मुलाला लिलावातून माघार घेण्यास सांगणार
"लिलावात उतरण्याआधी काही रक्कम भरावी लागते, मग २५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानतंर कोर्टात उर्वरित ७५ टक्के रक्कम भरावी लागते. आता ६७ कोटी ही किंमत कोर्टाने ठरवलेली आहे. पण पुढे प्रक्रिया काहीही झालेली नाही. जो व्यवहार पूर्ण झालेला नाही, त्यावरून टीका सुरू झाली. माझ्यावर जे आरोप झालेत त्यामुळे मी माझ्या मुलाला या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगणार आहे", असंही संजय शिरसाट म्हणाले. तसेच शिरसाटांनी असा इशारा दिला की, वैयक्तिक पातळीवरील आरोप सुरू राहिल्यास तेही धक्कादायक खुलासे करतील. हे प्रकरण पुढे आणखी गंभीर राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे. “मी संजय शिरसाट आहे. कोणाच्या घराला आग लावायला कमी नाही. चोख उत्तर देईन. व्यवसायात खोडा घालण्याचे पाप तुम्हाला फेडावे लागेल.” 

Web Title: Son will withdraw from Wits Hotel auction; Sanjay Shirsat warns opponents over allegations