काहींच्या नाका-तोंडातून उग्र दर्प! केवळ स्वच्छता नाही, 'या' व्हिटॅमिनची शरीरात कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:06 IST2025-02-04T19:05:22+5:302025-02-04T19:06:22+5:30
दातांना घट्ट पकडून ठेवण्याचे काम हे हिरड्या करत असतात. त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहणे हे दातांसाठी आवश्यक असते. तोंडात बॅक्टेरिया वाढल्याने श्वासात दुर्गंधी निर्माण होते.

काहींच्या नाका-तोंडातून उग्र दर्प! केवळ स्वच्छता नाही, 'या' व्हिटॅमिनची शरीरात कमतरता
छत्रपती संभाजीनगर : सुदृढ शरीरासाठी आवश्यक असलेल्या ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता अनेक शारीरिक समस्यांना निमंत्रण देते. विशेषतः तरुणांमध्ये दात-हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास मुख दुर्गंधी आणि श्वास दुर्गंधी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. केवळ स्वच्छता राखून हा प्रश्न सुटत नाही, तर ‘व्हिटॅमिन बी १२’ ची पातळीही योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे.
दातांना घट्ट पकडून ठेवण्याचे काम हे हिरड्या करत असतात. त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहणे हे दातांसाठी आवश्यक असते. तोंडात बॅक्टेरिया वाढल्याने श्वासात दुर्गंधी निर्माण होते. हिरड्यांमध्ये दाह, रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. जिभेवर पांढऱ्या थराचा संचय होतो, त्यामुळे तोंडाचा वास खराब येतो. धूम्रपान, गुटखा, तंबाखू व खर्रा यासारख्या गोष्टींमुळे हिरड्यांना इजा पोहचते. तसेच कार्बोनेटेड शीतपेय पिणे हे हिरड्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
‘व्हिटॅमिन बी १२’ मेंदूसाठी आवश्यक पोषकतत्त्व
‘व्हिटॅमिन बी १२’ हे शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे असते. हे न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यात मदत करते, मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देते आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त ठरते.
‘व्हिटॅमिन बी १२’ च्या कमतरतेने थकवा
सततचा थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर तो ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेचा इशारा असू शकतो. शरीरातील ऊर्जेचे उत्पादन कमी झाल्याने दिवसभर थकल्यासारखे वाटते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते.
‘व्हिटॅमिन बी १२’ वाढण्यासाठी काय कराल?
आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, सोयाबीन, डाळी, पालेभाज्या यांचा समावेश करावा. ‘व्हिटॅमिन बी १२’ची पातळी नियमित तपासावी. ‘व्हिटॅमिन बी १२’चे योग्यरित्या शोषण होण्यासाठी पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम राखावे. काही लक्षणे असल्यास वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
मुख स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको
मुख व श्वासासंबंधी दुर्गंधीचे मुख्य कारण हे तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष हे आहे. जिभेची स्वच्छता ठेवणे हे मुख, श्वास दुर्गंधी टाळण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. जीवनसत्त्वांची योग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते.
- डॉ. इंदिरा निलेश रोजेकर, दंत व मुख रोगतज्ज्ञ
दात, हिरड्यांवर परिणाम
‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेचे दात आणि हिरड्यांवर परिणाम होतात. हिरड्यांचे खराब आरोग्य आणि वाढलेल्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे अप्रत्यक्षपणे दातांवर परिणाम होऊ शकतो.
- डाॅ. विक्रांत जयस्वाल, दंत रोगतज्ज्ञ