...तर पाच मिनिटांत होईल छत्रपती संभाजीनगरात ब्लॅक आऊट! प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:44 IST2025-05-09T16:43:17+5:302025-05-09T16:44:01+5:30
ब्लॅकआऊटची परिस्थिती उद्भवली तर काय? मॉक ड्रिल होणार नसले तरी प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सतर्क

...तर पाच मिनिटांत होईल छत्रपती संभाजीनगरात ब्लॅक आऊट! प्रशासन सज्ज
छत्रपती संभाजीनगर : भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात ब्लॅक आऊट करण्याची गरज पडल्यास यंत्रणांनी सज्ज असले पाहिजे. प्रशासनाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप स्वामी यांनी गुरुवारी गोपनीय बैठक घेतली. ब्लॅक आऊटच्या सूचना आल्यातर पाच मिनिटांत शहरातील सर्व वीजपुरवठा बंद करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुरक्षिततेच्या दृष्टीने तिसऱ्या टप्प्यात आहे, त्यामुळे मॉक ड्रिल होणार नसले तरी सतर्कता गरजेची असल्याचे बैठकीत सूचित करण्यात आले.
बैठकीची माहिती देताना प्रशासकीय सूत्रांनी सांगितले, सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ब्लॅक आऊट करण्याबाबत काही सूचना आल्यातर काय करायचे, याबाबत सर्वांना सूचना दिल्या. रात्रीच्यावेळी जनरेटर, इन्व्हर्टर वापरायचे नाही. घरातील विजेची उपकरणे, स्ट्रीट लाईट कसे बंद झाले पाहिजेत. याबाबत सूचना दिल्या. वरिष्ठ पातळीवरून जर ब्लॅक आऊटबाबत सूचना आलीच तर पुढील नियोजन कसे असेल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. अवघ्या पाच मिनिटांत सर्व भागांतील वीज बंद करणे, याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे, सायरनचा त्यासाठी वापर करणे, याबाबत मंथन झाले.
शहर व परिसरात आवश्यक सायरन असून, ते व्यवस्थितपणे कार्यरत असल्याबाबत पाहणीही करण्यात आल्याचे संबंधित विभागाने नमूद केले. यासह अग्निशमन दलाची यंत्रणा सज्ज ठेवणे, सर्व हॉस्पिटलची अद्ययावत यादी करणे, औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर नजर....
सोशल मीडियातून अफवा पसरविणाऱ्यावर, चुकीची माहिती पसरविणाऱ्यावर सायबर यंत्रणेने करडी नजर ठेवली असून, चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश बैठकीत देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सर्व विभागांसोबत समन्वय, पोलिस विभाग सतर्क, सज्जही
राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बुधवारी सुरक्षेच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यातील आवश्यक सूचनांसंदर्भात गुरुवारच्या बैठकीतही आढावा घेण्यात आला. आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकासोबत संपर्कात आहोत. सर्व शासकीय विभागांचा अशा परिस्थिती उत्तम समन्वय असावा, यासाठी सर्व विभागांच्या अंतर्गत बाबींवर बैठकीत चर्चा झाली. ब्लॅक आऊट सारख्या परिस्थितीत मनपा, अग्निशमन विभाग, पोलिसांच्या अनेक साधनांचा वापर होतो. त्यासाठी सायरन सिस्टम, आयुक्तालय, पोलिस ठाण्यांची वाहनांसह संपूर्ण पोलिस दल सज्ज व सतर्क आहे, असे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील पवार यांनी केले.
ब्लॅकआऊटची परिस्थिती उद्भवली तर काय....
ब्लॅकआऊटची परिस्थिती उद्भवली तर त्याची माहिती विविध माध्यमांतून दिली जाईल. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजविल्यानंतर नागरिकांनी घरातील सर्व दिवे तातडीने बंद करण्याबाबत अलर्ट जारी करावा लागेल. लाइट सुरू राहिल्यास शत्रूच्या विमानांना लक्ष्य निश्चित करणे सोपे जाते. त्यामुळे ब्लॅकआऊट अत्यंत महत्त्वाचा असतो. दिवे बंद केल्यानंतर नागरिकांनी त्वरित इमारतीखाली येऊन पार्किंगसारख्या संरक्षित ठिकाणी जमावे लागते. आजूबाजूला हवाई हल्ला झाल्यास संभाव्य इजा टाळण्यासाठी ही उपाययोजना प्रभावी ठरते. सायरननंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तातडीने बंद करावी लागतात. कुणी जखमी झाल्यास प्राथमिक उपचार देऊन तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे.