कमिशन देत मजूर, गरिबांद्वारे गांजाची छोट्या प्रमाणात तस्करी; कर्नाटकचा फळ विक्रेता अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:30 IST2025-10-17T18:26:04+5:302025-10-17T18:30:23+5:30
रेल्वे स्थानकाकडून बाबा चौकात उतरलेल्या तरुणाकडे गांजाच्या पिशव्या असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने छावणी पोलिसांना दिली.

कमिशन देत मजूर, गरिबांद्वारे गांजाची छोट्या प्रमाणात तस्करी; कर्नाटकचा फळ विक्रेता अटकेत
छत्रपती संभाजीनगर : कमिशनचे आमिष दाखवून मजूर, गरीब कुटुंबांकडून राज्यभरात गांजाची तस्करी सुरू आहे. त्यात कमी प्रमाणात गांजा मिळाल्यास शिक्षेची तरतूदही कमी असल्याने त्यांच्याद्वारे छोट्या छोट्या पिशव्यांतून गांजा व तत्सम अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. छावणी पोलिसांनी नुकतेच कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील शेख महेबूब शेख नूर मोहम्मद (वय २६) या फळ विक्रेत्याला पकडल्यानंतर ही बाब निदर्शनास आली.
रेल्वे स्थानकाकडून बाबा चौकात उतरलेल्या तरुणाकडे गांजाच्या पिशव्या असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांना दिली होती. वरिष्ठांची परवानगी घेत जाधव, उपनिरीक्षक काकासाहेब नागवे यांनी १४ ऑक्टोबर रोजी ११:१५ वाजण्याच्या सुमारास बाबा चौकातील (भगवान महावीर चौक) लष्कराच्या मेससमोर सापळा रचला. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्या वर्णनाचा तरुण येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कपड्याच्या पिशवीत गांजा आढळताच तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यांच्या अहवालानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.
छोट्या प्रमाणात तस्करी, कायद्यातून सूट
छोट्या, अल्प प्रमाणात गांजा आढळल्यास शिक्षेची तरतूद कमी आहे. कायद्यातील ही पळवाट माहीत झाल्याने तस्करांकडून आता मोठ्या स्वरूपात गांजा व तत्सम अमली पदार्थांची तस्करी करणे बंद झाले. गरीब, मजूर, महेबूबसारख्या फळ विक्रेत्यांना पैशांचे आमिष दाखवून मागणीनुसार पाठवले जाते. त्यांना संबंधित शहर, गावातील माल स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा केवळ मोबाइल क्रमांक दिलेला असतो. शहरात उतरल्यानंतर त्यांच्याकडे काेड सांगून माल पोहोचवून परतण्याची भूमिका त्यांची असते. यासाठी त्यांना तिकीट, जेवणासह तस्करीचे पुरेसे पैसे दिले जातात. विशेष म्हणजे, महिलांवर संशय कमी येत असल्याने त्यांचा या तस्करीत अधिक वापर होत असल्याचे यापूर्वीच्या कारवाईवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात शेख महेबूबला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.