छत्रपती संभाजीनगर ते पुणे द्रुतगती मार्गाचे भूसंपादन लांबले, पुढच्या वर्षी होणार सुरुवात
By विकास राऊत | Updated: March 24, 2025 18:00 IST2025-03-24T17:59:01+5:302025-03-24T18:00:03+5:30
‘एनएचएआय’ने केलेले अलायन्मेंट कायम ठेवणार

छत्रपती संभाजीनगर ते पुणे द्रुतगती मार्गाचे भूसंपादन लांबले, पुढच्या वर्षी होणार सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन (एक्स्प्रेस-वे) द्रुतगती महामार्ग २५ हजार कोटींतून बांधण्यात येणार असून, सध्या या मार्गाचे भूसंपादन लांबणीवर पडले आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात या मार्गाचे भूसंपादन सुरू होईल, अशी शक्यता आहे. पुणे ते शिरूर या ५३ कि. मी. मार्गाचे सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती मार्गाच्या कामाचा विचार होईल. ‘एनएचएआय’ने केलेले अलायन्मेंट या मार्गासाठी कायम ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, झाल्टा येथे या महामार्गासाठी माती परीक्षणाचे काम महामंडळाने पूर्ण केले आहे. या मार्गाबाबत ३३ महिन्यांपूर्वी घोषणा झाली होती. जून २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून या मार्गाचे काम करण्यासाठी एनएचएआय (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) आणि शासनामध्ये करार झाला होता. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर), पुणे ही तीन जिल्हाधिकारी कार्यालये आणि एमएसआयडीसी भूसंपादन समन्वयाने करतील. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्ग भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) काढून २६ महिने झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील काही गावांतून मार्ग जाणे प्रस्तावित आहे. बिडकीनमध्ये एका उद्योगासाठी अलायन्मेंट बदलण्यात येणार आहे.
९ हजार कोटींतून विद्यमान मार्गाचे काम...
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या विद्यमान मार्गाचे नूतनीकरण ९ हजार कोटींतून होणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) त्याचे काम होईल. महामंडळाकडे मार्ग हस्तांतरित केला असून, राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एनएच-७५३ एफ असा या मार्गाचा क्रमांक आहे.