शहरात २०२१ मध्ये महिलांविषयी गुन्ह्यात किंचित वाढ; सतर्क पोलिसांनी ही गुन्हेगारांना दाखवली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 19:10 IST2022-01-11T19:08:43+5:302022-01-11T19:10:01+5:30
आपल्या शहरातील महिला खरंच सुरक्षित आहेत का?

शहरात २०२१ मध्ये महिलांविषयी गुन्ह्यात किंचित वाढ; सतर्क पोलिसांनी ही गुन्हेगारांना दाखवली जागा
- बापू सोळुंके
औरंगाबाद : महिलांच्या सुरक्षिततेविषयी सतत चर्चा होत असते. महिलांसाठी शहर सुरक्षित असल्याचा दावाही वेळोवेळी पोलिसांकडून केला जातो. मात्र, गतवर्षी महिलांविषयी झालेल्या घटनांचा विचार करता शहरातील महिला खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित होतो.
२०२० या वर्षाच्या तुलनेत शहरातील महिलांसंबंधीचे गुन्हे किंचित वाढले आहेत. गतवर्षी दोन महिलांचे खून, सहा महिलांच्या खुनाचे प्रयत्न झाले. बलात्काराच्या ८८ तर १९९ विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली. मात्र, पोलिसांनी बहुतेक गुन्हेगारांना त्यांची जागा दाखविली. गतवर्षी २०२१ साली पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झालेल्या ६७९ पैकी ६६० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली.
अपहरण झालेल्या महिला, मुलींचे काय होते ?
अल्पवयीन मुली अथवा १८ वर्षांपुढील महिलांच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होताच पोलीस अशा महिलांचा शोध घेतात. अल्पवयीन मुलींच्या गुन्ह्यांचा तपास फौजदार दर्जाचे अधिकारी करतात. बहुतेक मुली प्रेमप्रकरणातून स्वतःहून निघून जातात. तर काहींना फूस लावून पळवून नेण्यात येते. अशा मुली, महिलांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक असते.
मुलांना चांगले संस्कार द्यावे
आज सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महिलांना कमजोर समजून अत्याचार करण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी लहानपणापासून मुलांना महिला, मुलींचा आदर करायला शिकविले तरच महिलांसंबंधी गुन्हे कमी होतील.
-वैभव घुले, सामाजिक कार्यकर्ता.
महिलांसंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी
सन २०१९----- २०२०-------२०२१
खून- ०९-------००-------०२
खुनाचा प्रयत्न--११----०३----०६
हुंडाबळी-----०३-----०४-----०५
आत्महत्या----१८-------११---१०
बलात्कार--८५-----८४----८८
अपहरण---१३०----९७-----१००
विनयभंग---३०१----२४५----१९९
अनैतिक देह व्यापार--०३-----०७---०१
मंगळसूत्र चोरी- ३८---२४
विवाहितेचा छळ--२०६-----२६२