हॉटेल ग्रँड सरोवर आगीत दोन मजले खाक; वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:08 IST2025-04-12T16:58:50+5:302025-04-12T17:08:28+5:30
फॉरेन्सिक, विद्युत निरीक्षक, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला.

हॉटेल ग्रँड सरोवर आगीत दोन मजले खाक; वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला
वाळूजमहानगर : सोलापूर-धुळे महामार्गावर तीसगाव येथे असलेल्या आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरच्या समोरील भागाला गुरुवार १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत किचन, स्टोअररूमसह सहा रूम्सचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शुक्रवारी फॉरेन्सिक, विद्युत निरीक्षक, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला.
आगीत किचनमधील सर्व साहित्य, इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान झाले. पहिल्या मजल्यावरील परमीट रूममधील सर्व वस्तू आगीच्या लपेट्यात आल्या. तसेच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअर रूममधील गाद्या, उशा, सोफे व इतर साहित्य जळाले. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मजल्यावरील काही रूममधील बेड, खिडकीच्या काचा, फॅन, एलीडी, सोफा व इतर साहित्याला आगीची झळ बसली. हॉटेलचे कर्मचारी अनिल पवार यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.
हॉटेलच्या बाहेरील १६ एसी कॉम्प्रेसर जळाले. २२ खिडक्यांच्या काचा फुटल्या. दुसऱ्या मजल्यावर बाल्कनीतील फायबर शेड्स, हॉटेलच्या उजव्या बाजूला बाहेरून ॲल्युमिनियम पत्र्याचे लेअर वितळले. या हॉटेलमध्ये एकूण ४० कामगार असून आग लागली, त्यावेळी हॉटेलमध्ये चार ते पाच ग्राहक होते. आग लागताच हॉटेलमधील सर्व कामगार व ग्राहकांना बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. फॉरेन्सिक विभागाचे दिलीप परदेशी, दौलताबाद युनिट विद्युत शाखेचे शेख, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब काकड, बाळासाहेब आंधळे आदींनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. शिंदे यांच्याकडे घटनेचा तपास आहे.
महिन्याभरात पूर्ववत होईल
कालच्या आगीच्या घटनेत हॉटेलचे व्हेंटिलेशन एरियाचे नुकसान झाले आहे. एकूण हॉटेलच्या परिसराचा विचार केला तर हे नुकसान जास्त नाही. या आगीच्या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, हे महत्त्वाचे आहे. जे काही नुकसान झाले आहे, ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हॉटेलचा कुठलाही विमा काढलेला नव्हता. महिन्याभरात हॉटेल पूर्ववत व्हावे, यासाठी शुक्रवारपासून लगेच काम सुरू केले आहे.
- ऋषिकेश जैस्वाल, हॉटेल मालक.